ठाणे : नगरसेवक आणि प्रभाग सुधारणा निधीच्या कामांसाठी निधी मिळत नसताना महासभेत आयत्या वेळेचे विषय मंजूर केले जात असल्याचा मुद्दा मंगळवारी (दि. १७) महासभेत भाजपने उचलून धरला; परंतु भाजपचा विरोध डावलून शिवसेनेने आयत्या वेळेचे विषय गदारोळात मंजूर करून घेतले. बुधवारी झालेल्या महासभेत पुन्हा त्याच विषयावर चर्चा सुरू असताना मागील तीन महिन्यांत मंजूर करण्यात आलेले आयत्या वेळचे विषय रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी केली. हे विषय रद्द करून पुन्हा पटलावर आणण्याची विनंतीदेखील त्यांनी केली; परंतु यापुढील महासभेत आयत्या वेळचे विषय मंजुरीसाठी घेतले जाणार नसल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केले; परंतु यापूर्वी मंजूर केलेले विषय रद्द करता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
मंगळवारी महासभेत आयत्या वेळेचे १० ते १२ विषय मंजुरीसाठी पटलावर ठेवले होते. त्यावरून चांगलाच गदारोळ झाला. नियमबाह्य पद्धतीने आणि महत्त्वाचे विषय नसतानादेखील विषयपटलावर का आणले जातात, असा सवाल भाजपच्या नगरसेवकांनी केला. त्यामुळे नियमानुसार हे विषय पटलावर आणण्याची मागणी त्यांनी यावेळी लावून धरली; परंतु सत्ताधारी शिवसेना हे विषय मंजूर करण्यासाठी आग्रही असल्याचे दिसून आले. त्यामुळे भाजपच्या नगरसेवकांनी गोंधळ घालत या विषयांना विरोध केला.
बुधवारी महासभेत याच मुद्द्यावर पुन्हा भाजपचे नगरसेवक आक्रमक झाले. नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी आयत्या वेळेचे विषय मंजूर का केले जातात, असा सवाल केला. चुकीच्या पद्धतीने विषय मंजूर होतात. त्याचा गोषवारादेखील सदस्यांनी वेळेत दिला जात नसल्याचे त्यांनी सांगितले. हाच मुद्दा धरून राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी तीन महिन्यांत मंजूर करण्यात आलेले सर्वच आयत्या वेळचे विषय रद्द करण्याची मागणी केली. ते विषय पुन्हा नियमानुसार पटलावर आणण्याची विनंतीदेखील त्यांनी केली. यापुढे आयत्या वेळचे विषय पटलावर घेतले जाणार नसल्याचे महापौरांनी यावेळी स्पष्ट केले.
भाजप नगरसेवकाची महापौरांनी काढली विकेट
आयत्या वेळेच्या विषयावर चर्चा करताना भाजपचे नगरसेवक कृष्णा पाटील यांनी चुकीचे प्रस्ताव मंजूर केले जात असल्याचे सांगितले. त्यावर कोणते विषय मंजूर केले त्याचे वाचन करावे, असे महापौरांनी त्यांना सांगितले. त्यावर दिव्यातील रस्त्याचे काम डांबरीकरणाऐवजी सिमेंट कॉंक्रिटीकरणाद्वारे केले जात असल्याचा विषय त्यांनी वाचला. त्यावरून महापौरांनी कृष्णा पाटील यांच्यावर टीका केली. एकीकडे त्या रस्त्यावर उतरून आंदोलन करायचे आणि फोटोबाजी करायची आणि दुसरीकडे त्याच विषयासाठी विरोध करायचा, हे अयोग्य असल्याचे सांगत महापौरांनी भाजपचे नगरसेवक कृष्णा पाटील यांची विकेट काढली.