ठाणे : स्टेशन परिसरातील १८ मजली पॅरेडाईज टॉवरच्या एका भिंतीचे जरासे प्लास्टर वाऱ्यामुळे उडून बाजारात पडल्यानंतर बाजार परिसरात एकच गोंधळ उडाला. इमारत पडत असल्याची धूम अनेकांनी ठोकली. बाजारात पळापळ सुरू असताना इमारतीमधील एकाही रहिवाशाला त्याचा थांगपत्ता नव्हता. अखेर ही इमारत आहे त्याच ठिकाणी असल्याची शाश्वती महापालिकेच्या अग्निशमन विभाग आणि इतर यंत्रणांनी दिली.
बुधवारपासून वायू चक्रीवादळाचा प्रभाव मुंबईसह इतर भागात दिसून आला. त्यामुळे सोसाट्याचा वारा सुटत असताना स्टेशन परिसरातील १८ मजल्याच्या पॅराडाईज टॉवरच्या एका भिंतीचे प्लास्टर मार्केट परिसरात खाली पडल्याचे काही नागरिकांना दिसले. त्यानंतर मार्केटमध्ये एकच पळापळ सुरू झाली. इमारत हलते आहे, इमारत पडत आहे, अशी आरडाओरड करण्यास सुरुवात झाली. त्यामुळे मार्केटमधील दुकानदारांनी दुकाने सोडून पळ काढला. मार्केटमध्ये शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासाठी आलेल्यांनीही धावाधाव केल्याचे चित्र होते. मार्केटमध्ये हा गोंधळ सुरू असताना त्या इमारतीमधील एकाही रहिवाशाला त्याची कल्पना नव्हती. त्यानंतर काही तरी घडत आहे, असे वाटल्याने मार्केटमधील काहींनी याची माहिती अग्निशमन विभाग आणि आपत्ती विभागाला दिली. त्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या दोन्ही यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. परंतु, प्रत्यक्षात भिंतीचे थोडेसे प्लास्टर पडण्याखेरीज इमारत कुठेही हलली नव्हती. त्यातही खरबदारी म्हणून या यंत्रणांनी या इमारतीची संपूर्ण पाहणी केली.इमारतीच्या एका भितींचे किरकोळ प्लास्टर पडले होते. त्यानंतर इमारतीची पाहणी केली असता ती पूर्णपणे सुस्थितीत असल्याचे दिसून आले आहे.- मारुती गायकवाड, सहाय्यक आयुक्त, ठामपा