बदलापूर : महापुरात बाधित झालेले कुटुंब संसाराची जुळवाजुळव करत असतानाच मंगळवारी ठाणे जिल्ह्यात अफवांचा पूर आल्याने घबराट निर्माण झाली. बारवी धरणाचे दरवाजे उघडल्याने कल्याण, उल्हासनगर आणि अंबरनाथ तालुक्यात पुराचा धोका असल्याची बातमी सोशल मीडियातून पसरली होती. मात्र, सायंकाळी सोशल मीडियावरूनच अनेकांनी ही अफवा असल्याचे स्पष्ट केल्याने बदलापूरकरांचा जीव भांड्यात पडला.
ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे बारवी धरणाच्या दरवाजांचे काम पूर्ण झाल्याने या धरणात नव्या क्षमतेनुसार ७० टक्केच पाणीसाठा निर्माण झाला आहे. अजूनही ३० टक्के धरण भरणे बाकी असतानाच बारवी धरण भरल्याची अफवा बदलापुरात वाऱ्यासारखी पसरली. सोशल मीडियावर धरण भरल्याचे आणि बारवीचे दरवाजे उघडल्याची चर्चा होती. त्यामुळे पुरामुळे आधीच भेदरलेले कुटुंबीय चिंतेत आले. प्रत्येकाने त्याचा धसका घेतला होता. या अफेवेबाबत राजकीय पुढाऱ्यांनी प्रभाग आणि शहरात बारवीबाबतची बातमी अफवा असल्याचे स्पष्ट केले. माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी धरणाची सद्य:स्थितीतील पाण्याची पातळी व बंद असलेले दरवाजे यांचे फोटो टाकून नागरिकांना दिलासा दिला. ते पाहिल्यावर अनेकांच्या मनातील भीती कमी झाली.अशी परिस्थिती उद्भवल्यास काय? : बारवी धरणाचे दरवाजे उघडल्यास बदलापूर शहराला धोका निर्माण होण्याचा काहीच संबंध नाही. बारवीचे दरवाजे उघडले तरी त्याचा फटका हा नदी काठी असलेल्या गावाना बसेल. त्याचा कोणताच धोका बदलापूरला नाही. धरणाचे दरवाचे उघडले तर त्या पाण्याचा प्रवाह नालंबी, आणे, भिसोळ, कांबा या भागाला बाधित करणारा ठरू शकतो. मात्र, या धरणाची उंची वाढल्याने धरण भरण्यासाठी अजून बराच विलंब लागणार आहे.