मीरारोड - येणाऱ्या महापालिका निवडणुकीत एखाद्या नेत्याच्या मागे धावून वा त्याच्या शिफारशी वरून तिकीट मिळणार नाही, तर पक्षाचा सर्वेक्षण अहवाल आणि जनता सांगेल त्याच कार्यकर्त्याला तिकीट मिळणार, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाईंदर येथील भाजप जिल्हा कार्यालयाच्या बैठकीत स्पष्ट केले.
प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच बावनकुळे भाजपच्या भाईंदर येथील शहर जिल्हा कार्यालयात रविवारी रात्री आले होते. यावेळी आमदार गीता जैन, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष ऍड. रवी व्यास, महिला अध्यक्षा रीना मेहता, माजी अध्यक्ष हेमंत म्हात्रे सह अनेक नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
संघटनेत पक्षाचा अध्यक्ष अंतिम असतो व मीरा भाईंदर हा भाजपचा गड आहे. व्यास यांनी अजिबात चिंता करू नये, त्यांना पक्षा कडून पूर्ण ताकद देणार आहे. कोणी नेत्याच्या मागे धावून वा शिफारस करून तिकीट मिळणार नाही. सर्व जागांचे सर्वेक्षण केले जाईल, ज्यांची क्षमता आहे व जनता सांगेल त्यांनाच तिकीट दिले जाणार आहे. त्यामुळे नेत्यांच्या मागे फिरू नका, जनतेच्या मागे फिरा असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
येणाऱ्या पालिका निवडणुका युती ने लढणार आहोत. मीरा भाईंदर मध्ये महापौर भाजपचाच होणार असून खासदार, आमदार सुद्धा भाजपचा असेल असे ते म्हणाले.