ठाणे : बंदमुळे ठाणे रेल्वेस्थानकातून जवळपास जाण्यासाठी बस, रिक्षासह इतर कुठलीही वाहतूकसेवा उपलब्ध नसल्याने गरजवंतांची ठाणे स्टेशन ते तीनहातनाकादरम्यान घोडागाडी धावली.मराठा समाजाच्या मोर्चामुळे ज्यांना काही अंतर चालणेही कठीण होते, अशांसाठीही रिक्षा नव्हत्या. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. हे ध्यानात आल्याने एका घोडागाडीवाल्याने ही गरज ओळखून ठाणे स्थानक ते तीनहातनाक्यादरम्यान घोडागाडी चालवली. प्रत्येक प्रवाशामागे २० रुपये आकारले जात होते. प्रवाशांनाही पर्याय नसल्याने या घोडागाडीचा आधार घेतला. रिक्षा नसल्याने आम्ही घोडागाडीने आलो, असे काही प्रवाशांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. रिक्षा बंद आहेत, त्यामुळे घोडागाडीने प्रवाशांना सोडू या, असा विचार मनात आला आणि स्टेशनजवळ दुपारी ४ वा. घोडागाडी थांबवली, तर प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला, असे घोडागाडीचालकाने सांगितले. संध्याकाळी हळूहळू रिक्षाही सुरू झाल्याने नंतर घोडागाडी बंद करण्यात आली.दरम्यान, सकाळपासून बंद असलेली दुकाने दुपारी ४ नंतर हळूहळू सुरू झाली होती. सकाळपासून रस्त्यावर शुकशुकाट आणि सायंकाळी मात्र वर्दळ पाहायला मिळाली. ठाण्यातील बाजारपेठाही बंद होत्या. बंदमुळे सकाळपासून भाजी मार्केट बंद होते. दुपारी ४ वा. मार्केट सुरू झाले. परंतु बंदमुळे व्यवसायावर परिणाम झाला असल्याची भावना भाजीविक्रेत्यांनी व्यक्त केली. ठाण्यातील हॉटेल्स बंद असली, तरी जेवण पार्सलची सुविधा सुरू होती.
गरजवंत प्रवाशांसाठी धावली घोडागाडी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 12:25 AM