भिवंडी : महानगरपालिकेच्या प्रभाग समिती क्र. ५ च्या कार्यक्षेत्रातील अवैध बांधकामांवर कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याने ‘त्या’ ९ मनपा कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे. या कर्मचाऱ्यांची सध्या अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मनपा आयुक्त बालाजी खतगावकरांनी विधी अधिकाऱ्यांमार्फत निजामपूर पोलीस ठाण्यात सहा. आयुक्त जगदीश जाधव, निवृत्त मधुकर हेंदर पाटील, मोहन संभाजी केदार, अजित गोडांबे, विष्णू तळपडे, बीट निरीक्षक मारुती जाधव, तुकाराम चौधरी, प्रकाश वेखंडे, क्षेत्रीय अधिकारी साकीब खर्बे या ९ जणांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. शहरात काप इस्लामपुरा येथील घर क्र. ११२ या चार मजली इमारतीच्या अनधिकृत बांधकामांविरोधात स्थानिक नागरिकांनी तक्रार केली होती. त्यामुळे कादीर अब्दुल गफूर सरदार व इतर नागरिकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायाधीश अभय ओक व व्ही.आर. अचलिया यांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यात कसूर करणाऱ्या व अनधिकृत इमारतींना साहाय्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाई करून अहवाल पाठविण्यास सांगितले होते. त्यानुसार, आयुक्तांच्या आदेशानुसार विधी अधिकारी अनिल प्रधान यांनी निजामपूर पोलीस ठाण्यात या ९ जणांवर अखेर गुन्हा नोंदविला.
नऊ जणांची अटकपूर्व जामिनासाठी धावपळ
By admin | Published: December 03, 2015 12:45 AM