वासिंद : सध्या कडक लॉकडाऊन असल्यामुळे रेस्टॉरंट बार, ढाबे बंद आहेत. त्यामुळे मद्यपींची काेंडी हाेत असून पार्ट्यांसाठी ते धरण क्षेत्र, नदी-ओहळांच्या काठांचा आसरा घेत आहेत. मात्र, या मद्यपींच्या उपद्रवामुळे निसर्गरम्य भागात दारूच्या बाटल्या, कचऱ्याचा ढीग जमा हाेत आहे. काही जण तेथेच बाटल्या फाेडून टाकत असल्यामुळे त्याचा त्रास या परिसरात फरफटका मारण्यासाठी येणाऱ्या इतर नागरिकांना हाेत आहे. अनेकदा कायदा-सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण हाेत आहे.
ठाणे-पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनेक धरणे, नद्या आहेत. मासेमारी आणि शेती हे पारंपरिक व्यवसाय येथे केले जातात. सध्या कोरोना साथरोगमुळे रेस्टॉरंट बार, धाबे बंद आहेत. त्यामुळे मद्यपींनी आपला माेर्चा धरण क्षेत्र, नदी-ओहळाकडे वळवला आहे. तेथे हाेणाऱ्या पार्ट्यांनंतर दारूच्या बाटल्या, चाखणा व जेवणाचे साहित्य तेथेच पडून असतात. यामुळे निसर्गस्थळाचे नुकसान हाेत आहे. मत्स्य व्यावसायिक, शेतकरी, फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक जण नशेतच पाण्यात उतरतात. त्यामुळे पाण्यात बुडण्याच्या घटनाही घडत आहेत. सध्या कोरोनामुळे सर्व शासकीय यंत्रणा व्यग्र आहेत. त्यामुळे मद्यपींना धरणक्षेत्र, नदी-ओहळ परिसरात पार्ट्या झोडण्यास माेकळे रान मिळत आहे.
पार्ट्या करण्यासाठी येणाऱ्यांना पाेलिसांचा चाेप
शहापूर तालुक्यातील भातसा धरणाच्या नदीपात्रामध्ये पार्ट्या करून धिंगाणा घालणाऱ्यांना रविवारी पोलिसांनी चांगलाच चोप दिला. दोन वर्षांपासून कोरोनाची महामारी असतानाही या धरणाच्या खाली नदीपात्रात ठाणे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर लोक पार्ट्या करण्यासाठी येत होते. सजिवली, सावरशेत येथील ग्रामस्थ, खासकरून महिलांना त्रास सहन करावा लागत हाेता. अखेर या कारवाईमुळे या प्रकारांना आळा बसेल, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
दारू पिऊन काचेच्या बाटल्या तेथेच फाेडणे, त्याच्या काचा पाण्यात टाकणे असे प्रकार घडत हाेते. यासंदर्भात ग्रामपंचायतीतर्फेही तक्रार करण्यात आली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. ‘लाेकमत’मधून अनेकदा बातम्या प्रसिद्ध करून या गैरप्रकारांकडे लक्ष वेधण्यात आले हाेते. साजिवली गावातील ग्रामपंचायत सदस्या नीता शिरोसे व त्यांचे पती तुकाराम शिरोसे यांनी भातसानगरमधील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या बेशिस्त नागरिकांना अद्दल घडवावी, अशी मागणी केली. अधिकाऱ्यांनी त्वरित शहापूर पाेलिसांशी संपर्क साधून या प्रकाराबाबत तक्रार केली. पाेलिसांनी रविवारी सायंकाळी या पार्ट्या करणाऱ्या व्यक्तींना चांगलाच चाेप देऊन पिटाळून लावले. या कारवाईनंतर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
सध्या शासनाने जमावबंदी लागू केली आहे. शिवाय, निसर्गरम्य परिसरात कचरा करणे, बाटल्या फाेडणे यासारखी कृत्ये ही दंडनीय गुन्हाच ठरवायला हवा.अशा लोकांवर पोलीस प्रशासनाने कडक कारवाई करायला हवी. अन्यथा कायदा-सुव्यवस्थाही बिघडू शकते. सुजाण सुरेश वडके, जागृत नागरिक, वासिंद-शहापूर
धरणक्षेत्र, नदीकाठी अशा प्रकारे पार्ट्या करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी विशेष पथक तयार करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे अशाप्रकारांना भविष्यात निश्चितच आळा बसेल. - नवनाथ ढवळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, शहापूर