भिवंडी : राज्य सरकारने अंबाडी येथे मंजूर केलेल्या ग्रामीण रुग्णालयासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्यामुळे वज्रेश्वरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मंजूर रुग्णालय सुरू करावे, अशी सूचना केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी प्रशासनाला केली आहे. त्याचबरोबर ग्रामीण रुग्णालयासाठी अंबाडी परिसरात जागा लवकरात लवकर निश्चित करावी, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.
राज्य सरकारने तत्कालीन आमदार विष्णू सवरा यांच्या मागणीनंतर २००६-०७ मध्ये भिवंडी तालुक्यातील अंबाडी परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन १०० बेडचे ग्रामीण रुग्णालय मंजूर केले होते. मात्र, या रुग्णालयासाठी अंबाडी परिसरात पुरेशी जागा उपलब्ध नाही. त्यामुळे भाड्याच्या जागेत रुग्णालय सुरू झाले. या ठिकाणी सध्या केवळ ओपीडी चालविली जाते. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना तातडीच्या उपचारांसाठी ठाणे वा भिवंडी शहरात जावे लागते. या पार्श्वभूमीवर अंबाडी येथे मंजूर केलेले रुग्णालय तात्पुरते वज्रेश्वरी येथील सध्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू करावे, अशी मागणी पंचायत समितीच्या माजी सभापती रविना रवींद्र जाधव यांनी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडे केली होती. त्यानुसार पाटील यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे व जिल्हा शल्यचिकित्सक कैलास पवार यांना सूचना केली आहे. त्याचबरोबर जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना लवकरात लवकर जागा निश्चित करण्याचे निर्देशही दिले आहेत.