Russia-Ukraine Conflict: पहाटे बॉम्ब, गोळीबाराचे आवाज कमी झाल्यावर लागला डोळा! मुरबाडच्या शुभमने सांगितली आपबीती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2022 06:17 AM2022-02-27T06:17:25+5:302022-02-27T06:18:16+5:30
अगदी छोटासा आवाज आला तरी मन भीतीने थरथर कापत होते, अशा शब्दांत तेथील परिस्थितीचे वर्णन मुरबाडचा शुभम म्हाडसे याने ‘लोकमत’कडे केले.
सुरेश लोखंडे, लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: रशियाकडून युक्रेनमधील सुमी विद्यापीठाच्या परिसरात शुक्रवारी रात्रभर बॉम्बहल्ले सुरू होते. पहाटे बॉम्ब व गोळीबाराचे आवाज कमी झाल्यावर आम्हाला डुलकी लागली. मात्र, अगदी छोटासा आवाज आला तरी मन भीतीने थरथर कापत होते, अशा शब्दांत तेथील परिस्थितीचे वर्णन मुरबाडचा शुभम म्हाडसे याने ‘लोकमत’कडे केले. शुभम हा वैद्यकीय शिक्षणाकरिता तिकडे गेला आहे.
युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेले जिल्ह्यातील ३८ विद्यार्थी अडकले आहेत. शुक्रवारी, शनिवारी या विद्यार्थ्यांच्या पालकांनी जिल्हा प्रशासनासोबत संपर्क करून आमची मुले तिकडे अडकली असल्याचे कळवले. शुभम हा युक्रेनमधील ‘समस्का ओबलास्टा’ या राज्यातील सुमी विद्यापीठात एमबीबीएस करीत आहे. ठाण्यातील चार, भिवंडीतील तीन, मीरा भाईंदरमधील दोन, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, पडघा (ता. भिवंडी) आणि नेरूळ येथील प्रत्येकी एक विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणासाठी तिकडे गेले आहेत. बहुतांश विद्यार्थी तिकडेच अडकले आहेत.
शुभम म्हणाला की, रस्त्यावर बाहेर पडणे दोन दिवस मुश्कील असल्याने दिवस कधी उगवला व मावळला तेच कळत नाही. बंकरमध्ये जीव मुठीत धरून बसायचे आणि बॉम्ब हल्ल्याचे व अंदाधुंद गोळीबाराचे आवाज ऐकत राहायचे एवढेच सध्या आमचे प्राक्तन आहे. बुडापेस्ट येथील भारतीय दूतावासातील अधिकारी आमच्या संपर्कात आहेत हीच आमच्या परतीची आशा आहे. दोनवेळ कसेबसे दोन घास पोटात ढकलून आम्ही दिवस काढत आहोत. बाहेरील दृश्य किती भीषण असेल याची कल्पनाही करवत नाही.