कल्याण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात केलेल्या लॉकडाऊनचा मोठा फटका सर्वच ठिकाणचे कारखानदार, उद्योजकांना बसला आहे. मात्र, डोंबिवली एमआयडीसीतील कंपन्यांनी प्रदूषणाला आळा घालण्यासंदर्भातील अटीशर्थींचे पालन न केल्याने त्या लॉकडाऊनपूर्वीच बंद करण्यात आल्या होत्या. अनलॉक-१ मध्येही कंपन्या सुरू करण्याची परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे कंपन्यांमधील मशीनला गंज चढू लागल्याने कंपनी मालकांच्या नुकसानीत आणखीनच भर पडली आहे.डोंबिवली एमआयडीसीत रासायनिक, इंजिनिअरिंग, टेक्सटाइल, औषधनिर्माण करणाऱ्या अशा विविध प्रकारच्या ४२० कंपन्या आहेत. त्यापैकी अनेक कंपन्या प्रदूषणाला आळा घालण्यासंदर्भातील तसेच सुरक्षिततेच्या नियमावलीचे पालन करत नसल्याने त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी जोर धरत होती. त्याचदरम्यान, प्रदूषणामुळे रस्ता गुलाबी झाल्याची घटना घडली. गुलाबी रस्त्याची पाहणी करण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंपन्यांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार जवळपास ३०० पेक्षा जास्त कंपन्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यातील ३२ कंपन्यांना बंद करण्याचे आदेश दिले होते. सुरक्षा आॅडिट न केलेल्या तसेच पाच वर्षांत प्रदूषणाच्या अटी शर्तीचे पालन न केल्याप्रकरणी ५० पेक्षा जास्त कंपन्यांना २५ लाख ते एक कोटी पर्यंतचा दंड आकारून या कंपन्या बंद करण्याची कारवाई केली होती. या कारवाईच्या विरोधात कंपनी मालकांनी स्वत:हून उत्पादन बंद आंदोलन सुरू केले. त्यात कामगारही सहभागी झाले होते.मात्र, कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्याने पोलिसांनी हे आंदोलन मागे घेणास भाग पाडले. त्याचदरम्यान २४ मार्चपासून लॉकाऊन सुरू झाल्याने कंपन्या बंद आहेत. त्यामुळे कंपन्यांतील मशीनला गंज चढू लागला आहे. एका मशीनला किमान १५ दिवसांच्या अंतराने देखभाल दुरुस्तीची आवश्यकता असते. आधीच उत्पादन बंद असल्याने कंपनी मालकांना नुकसान सहन करावे लागले आहे. त्यात आता मशीन गंजल्याने त्यांच्या नुकसानीचा आकडा वाढणार आहे. कंपन्या सुरू करण्याची परवानगी दिली जात नसल्याची आरोड कंपनी मालकांकडून सुरू आहे. दरम्यान, ६० कंपन्यांना ११ मेपासून उत्पादन सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे.‘एकही अर्ज आलेला नाही’ : यासंदर्भात औद्योगिक आरोग्य व सुरक्षा संचालनालयाच्या कल्याण कार्यालयाचे प्रमुख विनायक लोंढे म्हणाले, ज्या कारणांसाठी कंपनी बंद केली होती, त्या अटी-शर्तींची पूर्तता केल्यास कंपनी सुरू करण्यास परवानगी दिली जाऊ शकते. मात्र, अटी-शर्तींची पूर्तता केल्याचा एकही अर्ज माझ्याकडे आलेला नाही.
डोंबिवली एमआयडीसीतील बंद कंपन्यांमध्ये मशीनला गंज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 12:42 AM