ठाणे : काश्मीर मधील स्थानिक लोकांचे दुःख सादर करणाऱ्या मोठ्यांच्या गटातून सचिन फडतरे यांनी तर पहिल्या छोट्या मुलांच्या गटात संशयकल्लोळ मधील कृतिकेची भूमिका आर्या मोरे हिने दिमाखदारपणे सादर करुन प्रथम क्रमांक पटकावला. ब्रह्मांड कट्टा व मधुगंधार यांच्या संयुक्त विद्यमाने ब्रह्मांड ठाणे येथे "चुरस नवरसाची" एकपात्री अभिनय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
सदर स्पर्धेला स्पर्धकांनी भरभरून प्रतिसाद दिला. ठाणे डोंबिवली कल्याण मुंबई पश्चिम उपनगर येथून स्पर्धकांनी भाग घेतला होता. स्पर्धेची प्राथमिक फेरी मकुन्स प्ले स्कूल, ब्रह्मांड येथे आयोजित करण्यात आली होती. पहिला गट 5 ते 15 तर 15 पुढील असा दुसरा गट. या दोन्ही गटात मिळून 75 स्पर्धकांनी भाग घेतला होता. या प्राथमिक फेरीत स्पर्धकांनी निरनिराळ्या विषयांवर आपली अभिनय कला सादर केली. प्राथमिक फेरीच्या स्पर्धेसाठी सिने कलाकार राजू पटवर्धन, आशा ज्ञाते, अंजली आमडेकर व श्रीप्रकाश सप्रे यांनी परीक्षकांचे काम पार पाडले व पहील्या गटाचे दहा व दुसऱ्या गटातील दहा असे वीस स्पर्धकांची निवड अंतिम फेरी साठी करुन दिली. एकपात्री अभिनय स्पर्धेची महाअंतिम फेरी ब्रह्मांड कट्टयावर सांज स्नेह सभागृहात परिक्षक अभिनेता दिग्दर्शक प्रबोध कुलकर्णी व अभिनेत्री सुषमा रेगे यांच्या समोर झाली. अंतिम फेरीसाठी निवडण्यात आलेल्या सर्व कलाकारांनी आपली अभिनय कला सादर केली. आपली कला सादर केल्यानंतर तात्काळ आयोजकांनी दिलेल्या चिठ्ठीनुसार नऊ रसा पैकी कुठल्याही एका रसावर आपली कला सादर करण्यास सांगण्यात आले. सर्व मोठ्या स्पर्धकांनी सुंदर रित्या ही नवरसांची कला सादर केली. ही चुरस खरोखरच नवरसांची ठरली. पहिल्या छोट्या मुलांच्या गटात संशयकल्लोळ मधील कृतिकेची भूमिका आर्या मोरे हिने दिमाखदारपणे सादर करुन प्रथम क्रमांक पटकावला तर द्वितीय क्रमांक सोमांश राऊत व तृतीय क्रमांक किर्ती खांडे हिला देण्यात आला. तसेच अलिशा पेडणेकर व तेजल चौगुले यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. या बक्षिस समारंभासाठी आमदार संजय केळकर व महाराष्ट्र हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सिताराम राणे हे उपस्थित होते. मोठ्यांच्या गटातुन द्वितीय क्रमांक वृषाली मळेवाडकर हीने झाडे लावा झाडे जगवा या विषयांचा संदेश देणाऱ्या कलेला देणेत आले तर तिसरा क्रमांक रोहन हिरवे यांना वऱ्हाड निघालंय लंडनला याचे सादरीकरणा बद्दल देण्यात आला. तसेच पोलीसांचे मनोगत व्यक्त करणाऱ्या अविनाश गायकवाड याला उत्तेजनार्थ बक्षीस बहाल करण्यात आले. मोठ्या गटाचा बक्षीस समारंभ सिने व नाट्य अभिनेता संजय क्षेमकल्याणी यांचे हस्ते करण्यात आला. या स्पर्धत लहान मुलापासून जेष्ठ नागरिकांनी भाग घेतला होता. असेच दोन जेष्ठ नागरिक बापू भोगटे व कांचन चितळे यांना उत्तम सहभागाबद्दल गौरविण्यात आले. सदर स्पर्धेचे आयोजन व सूत्रसंचालन ब्रह्मांड कट्टयाच्यावतीने मधुगंधारच्या संचालिका मधुगंधा इंद्रजीत हिने केले तर आभार प्रदर्शन ब्रह्मांड कट्टयाचे आयोजक संस्थापक राजेश जाधव तर पाहुण्याचे स्वागत अध्यक्ष महेश जोशी यांनी केले.