ठाणे : ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर यांना ठाण्यात गंधार गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. ज्येष्ठ संगीतकर अशोक पत्की यांच्या हस्ते आणि आ. संजय केळकर, ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रदीप ढवळ, अशोक समेळ, अशोक बागवे, विजू माने, विनय जोशी, प्रा. मंदार टिल्लू यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कोणत्याही कलाकाराला वयाचे बंधन नसते, कलाकार हा वयाच्या कक्षेत नसतो असे सांगत त्यांनी बालकलाकारांनी सादर केलेल्या सादरीकरणाचे कौतुक केले. मातृभाषा जपा, आईवर जसे प्रेम करता तसे मातृभाषेवरही प्रेम करा. इंग्रजी, हिंदी, उर्दू या भाषा मी पण बोलतो. कोणत्याही भाषेला नाही म्हणू नका, पण मातृभाषेला प्राधान्य द्या. मराठी खा आणि मराठी बोला, तुमच्या संस्कृतीवर प्रेम करा तरच तुम्ही पुढे जाल असा सल्ला पिळगावकर यांनी कलाकारांना दिला.
यावेळी आ. आशिष शेलार यांनी देखील कार्यक्रमाला उपस्थित राहून सदिच्छा दिल्या. बालरसिकांनी दिलेले प्रेम, त्यांची ऊर्जा मला आणखीन पुढे नेणार आहे अशा शब्दांत त्यांनी कौतुकही केले. पिळगावकर यांच्या चित्रपटांचा इतिहास यावेळी बालकलाकारांनी उलगडला. यावेळी त्यांच्या चित्रपटांतील पात्रांचे सादरीकरण बालकलाकारांनी करून त्यांना मानवंदना दिली.