बदलापूर : बदलापूरमधील प्रसिध्द चित्रकार सचिन जुवाटकर यांच्या कलादालनाचे उद्घाटन शुक्रवारी कलाकारांच्या उपस्थितीत झाले. यावेळी प्रदर्शनात ठेवण्यात आलेली चित्रे पाहण्यासाठी बदलापूरच्या रसिकांनी गर्दी केली होती.सुरेख चित्र आणि चित्रातील रंगांनी देशपातळीवर नवी ओळख निर्माण करून दिलेले प्रसिध्द चित्रकार सचिन जुवाटकर यांचे कलादालन बदलापूरमध्ये सुरू करण्यात आले आहे. या कलादालनाचे उद्घाटन मराठी चित्रपटसृष्टीतील विजू माने, जयराज नायर, अभिजीत चव्हाण, कुशल बद्रिके, संदीप राऊत यांच्या उपस्थितीत करण्यात आले.बेलवली येथील एकविरा हाईटस या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर एका प्लॅटमध्ये हे कलादालन सुरू केले आहे. या ठिकाणी जुवाटकर यांनी साकारलेल्या सर्वाेत्कृष्ट कलाकृती ठेवण्यात आल्या आहेत. खाजगी कलादालन निर्माण करत असताना आपल्या चित्रांमधील रंगछटा बदलापूरकरांना पाहता यावी यासाठी तीन दिवस चित्रप्रदर्शन भरवण्यात आले आहे. उद्घाटनानंतर प्रत्येक चित्राची आणि त्यामागील संकल्पनेची माहिती जुवाटकर यांनी उपस्थितांना करुन दिली.विजू माने यांनी या कलाकृतींचे कौतूक करत हे कलादालन बदलापूरकरांच्या मानाचा तुरा ठरेल असा विश्वास व्यक्त केला. तर अभिनेते कुशल बद्रिके यांनीही या चित्रांचे कौतूक केले. ते बदलापूरमध्ये राहतात हे मोठे भाग्य असल्याचे ते म्हणाले.
सचिन जुवाटकर यांच्या कलादालनाचे उद्घाटन, बदलापूरच्या रसिकांना मिळाली चांगली संधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 4:38 AM