ठाणे : यंदा ठाणेकरांनी पर्यावरण स्नेही गणेशोत्सवावर भर दिला असून, यावर्षीच्या दहा दिवसांपर्यंतच्या गणेशोत्सवात ५० टन निर्माल्याचे संकलन झाले आहे. विशेष म्हणजे यात ९९ टक्के प्लास्टिक, तर १०० टक्के थर्माकॉल हद्दपार झाला आहे.
ठाणे महापालिका व समर्थ भारत व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने गेली १४ वर्षे निर्माल्य संकलन आणि त्यापासून खतनिर्मितीचा उपक्रम राबविला जात आहे. जलप्रदूषण रोखण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला होता. गणेशोत्सवदरम्यान येणारे निर्माल्य हे फक्त निर्माल्य कलशातच जमा व्हावे यासाठी विसर्जन घाटांवर निर्माल्य कलश ठेवले होते. या उपक्रमाला ठाणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. यंदा फक्त ५० टन निर्माल्य संकलित झाले असल्याची माहिती समर्थ भारत व्यासपीठचे भटू सावंत यांनी दिली. यंदा कोरोनामुळे कमी प्रमाणात निर्माल्य संकलित झाल्याचे ते म्हणाले.
चार वर्षांपूर्वी ३२५ टन निर्माल्य संकलित झाले होते. हे प्रमाण हळूहळू कमी होत आहे. पूर्वी निर्माल्यात प्लास्टिक आणि थर्माकॉलचा बेसुमार वापर होत होता. ठाणेकर पूर्णपणे पर्यावरणस्नेही गणेशोत्सवाकडे वळल्याने यंदा ९९ टक्के प्लास्टिक, तर १०० टक्के थर्माकॉल निर्माल्यातून नाहीसे झाल्याचे संस्थेने सांगितले.
यावर्षीच्या गणेशोत्सवात खालीलप्रमाणे निर्माल्य संकलित झाले.
दीड दिवस : १२ टन
पाच दिवस : १७ टन
सात दिवस : १० टन
दहा दिवस : ११ टन