ठाणे : बाबुजी, गदिमा आणि पुलं यांच्या जन्मशताब्दी वषार्निमित्ताने या तिघांच्या सहचरणींचे त्यांच्या यशातील योगदान, त्यांच्या सहजीवनाचा प्रवास अत्रे कट्ट्यावर संध्या टेंबे यांनी प्रसंग आणि किस्स्यांच्या माध्यमातून उलगडले. या तिघींमध्ये गृहिणी, सखी आणि सचिव हे तीन्ही गुण होते असेही त्यांनी यावेळी सांगितले. बाबुजी, गदिमा आणि पुल या तिघांनी आपले सांस्कृतिक, साहित्यिक, सांगितीक जीवन आनंदी बनविले. त्यांचे जीवन आनंदी बनविणाऱ्या त्यांच्या सहधर्मचरिणींचे ऋण आपण मान्य करायला हवे असे सांगत तिघीही मुळात कलावंत, त्या तिघींचा परिचय, त्यांच्या कलांविषयी, कर्तुत्वाविषयी व त्यांच्या गृहिणी, सखी, सचिव भूमिकेविषयी टेंबे यांनी सांगितले. यावेळी टेंबे म्हणाल्या, विद्याताई माडगूळकर यांच्यात गृहिणी, ललिताबाई फडके यांच्यात सखी आणि सुनिताबाई देशपांडे यांच्यात सचिव हे गुण होते. या तिघींत गृहिणी, सखी आणि सचिव हे तिन्ही गुण असले तरी प्रत्येकीत एकेक गुणांचे प्राबल्य दिसते. गदिमा यांच्या पत्नी विद्याताई यांनी त्यांच्यासाठी आपले गाणे सोडले. या क्षेत्रात दोघेही राहिले तर संसार नीट होणार नाही त्यामुळे विद्याताईंनी आपले गाणे संसाराकडे पुर्ण लक्ष दिले, त्यामुळे गदिमांना त्यांच्या पत्नीच्या पाठिंब्यामुळे त्यांना घरची चिंता नव्हती. वयाच्या दहाव्या- अकराव्या वर्षापासून ललिताबाई या सिनेक्षेत्रात होत्या. हिंदी चित्रपट सृष्टीत त्यांनी गायनाला सुरूवात केली. मोहम्मद रफी हे त्यांचे कृतज्ञ आहेत. रफी हे नवखे असताना या क्षेत्रात ललिताबाईंनी त्यांना धीर दिला. वडिलांचे कर्ज फेडण्यासाठी त्यांनी हे करिअर सुरू केले. पण त्या या क्षेत्राला कंटाळलेल्या होत्या. गाऊन गाऊन घसा खराब, आवाज बसायला लागला. परंतू बाबूजींशी लग्न झाल्यावर त्यांनी न गाण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर त्या हौसे खातर मात्र त्या गायिला. बाबूजींच्या संगीत दिग्दर्शनाखाली ६० हून अधिक त्यांची गाणी आहेत. पुल अनेक कलांमध्ये वाकबगार होते. सुनिताबाईंबरोबर त्यांनी चित्रपटांत काम केले होते. त्या स्वत: उत्तम गायिका होत्या, कविता करायच्या तसेच, लेखिकाही होत्या. पण त्या बॅकफुटवर राहिल्या नाहीत. पुलंच्या प्रतिभेला धुमारे सुटत असताना त्या त्यांच्या पाठिशी उभ्या राहिल्या. पुल हे व्यवहारी नव्हते पण सुनिताबाईंनी खंबीरपणे त्यांचा आर्थिक व्यवहार सांभाळला होता. पुढच्या काही वर्षात त्यांनी पुल पाऊंडेशनच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये दान केले आहेत. स्वत:करिता त्यांनी कधी काही ठेवले नाही. त्यांची राहणी साधी होती पण त्या काटकसरही होत्या. १९४२ च्या चळवळीत त्यांनी भाग घेतला होता. त्यांच्या आई वडिलांची आर्थिक स्थिती चांगली होती. या तिघीही गृहिणी सखी सचिव होत्या.
गदिमा, बाबुजी आणि पुल यांच्या सहचरिणी या गृहिणी, सखी, सचिव होत्या : संध्या टेंबे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 3:53 PM
आचार्य अत्रे सांस्कृतिक मंडळातर्फे ‘गृहिणी सखी सचिव’ हा कार्यक्रम आयोजित केला होता.
ठळक मुद्देदिमा, बाबुजी आणि पुल यांच्या सहचरिणी या गृहिणी, सखी, सचिव : संध्या टेंबेआचार्य अत्रे सांस्कृतिक मंडळातर्फे ‘गृहिणी सखी सचिव’ हा कार्यक्रम बाबुजी, गदिमा आणि पुलं यांच्या जन्मशताब्दी वषार्निमित्ताने कार्यक्रम