ठाणे : तलाव तसेच समुद्राच्या खाडीतील पाण्यात गणेशमूर्तींचे विसर्जन करणा-या जीवनरक्षकांना नेहमीच धोक्याचा सामना करावा लागतो. आपला जीव धोक्यात घालून मूर्ती विसर्जन करणा-या जीवनरक्षकांना दुखापत अथवा दुर्दैवी घटना घडलीच, तर विमाकवच आवश्यक आहे.
ठाणे शहरातील कृत्रिम विसर्जन घाट तसेच खाडीकिनारी बाप्पांच्या मूर्ती प्रथेप्रमाणे विसर्जनासाठी जीवनरक्षकांकडे यंदाही सुपूर्द करण्यात येत आहेत. मूर्ती विसर्जनासाठी भविकांनी सुरक्षेच्या दृष्टीने पाण्यात उतरू नये, असे आवाहन महापालिकेकडून केले जात आहे. भाविकांकडूनही त्याला प्रतिसाद मिळत आहे. परंतु, मूर्तींचे विसर्जन करताना काहीवेळा जीवनरक्षकांचाच जीव धोक्यात असल्याची माहिती नगरसेवक भरत चव्हाण यांनी दिली.
बाप्पाच्या मूर्तींचे वाहत्या पाण्यात विसर्जन करण्याची परंपरा जुनी आहे. त्यामुळे खाडीकिनारी असलेल्या घाटावर, मूर्ती विसर्जनाला सर्वाधिक पसंती दिली जाते. विसर्जन करताना जीवनरक्षकांची तारेवरची कसरत होते. खाडीत ओहोटीच्या काळात विसर्जनाची खरी कसोटी लागते. ठाणे पूर्वेतील चेंदणी कोळीवाडा बंदरावर (विसर्जन घाट) येथील खाडीला ओहोटी लागते तेव्हा पाण्याची पातळी खाली जाते. अशावेळी चिखलातून मार्ग काढताना, चिखलातील काच किंवा टोकेरी वस्तू पायाला लागून, जीवनरक्षक जखमी होण्याच्या अनेक घटना घडतात. काही वर्षांपूर्वी एका तरुणाचा मूर्ती विसर्जन करताना पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. त्यामुळे या जीवनरक्षकांना सुरक्षेच्या दृष्टीने विमाकवच देण्याची गरज असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक घाग यांनी व्यक्त केले आहे.
.....
मूर्ती विसर्जन करतेवेळी जीवनरक्षकांना दक्षिणा देण्याबाबत कोणतेच बंधन नाही. त्यामुळे गणेशोत्सवात गेल्या १५ वर्षांपासून घाटावर काम करणा-या जीवनरक्षकांना पालिकेने मानधन द्यावे. सोबत विम्याचे सुरक्षारक्षकही देणे आवश्यक असल्याची मागणी आगामी महासभेत करणार आहे.
भरत चव्हाण, ज्येष्ठ नगरसेवक, ठाणे