अंबरनाथ: डोंबिवलीच्या प्रदूषणाच्या बातम्या दररोज येत असताना आता अंबरनाथमध्येही प्रदूषणाने डोकंवर काढल्याचे पाहायला मिळत आहे. कारण अंबरनाथच्या वालधुनी नदीवर चक्क भगव्या रंगाचा तवंग पसरला आहे. त्यामळे ही वालधुनी नदी आहे की भगवी नदी आहे हा प्रश्न पडला आहे.
आनंदनगर एमआयडीसीत उगम पावणारी वालधुनी नदी एमआयडीसी भागातून वाहत शहरात येते. मात्र एमआयडीसीत या नदीत अनेक रासायनिक कंपन्यांमधून थेट सांडपाणी सोडलं जातं. ही बाब सध्याची नदीची अवस्था पाहिल्यावर सिद्ध झाली आहे. अंबरनाथ एमआयडीसीतल्या रासायनिक कंपन्यांमध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात नसल्याचंही यानिमित्ताने समोर आल आहे.
त्यामुळे वालधुनी नदीचा अक्षरशः रासायनिक नाला झाला असून याकडे एमआयडीसी, एमपीसीबी किंवा पर्यावरण विभाग यांच्यापैकी कुणाचंही लक्ष नाही. विशेष म्हणजे राष्ट्रीय हरित लवादाने काही वर्षांपूर्वी या नदीच्या पुनरुज्जीवसाठी स्थानिक महापालिका आणि एमआयडीसी यांना जवळपास १०० कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. हा दंड तर भरला गेला नाहीच, उलट नदीची अवस्था दिवसेंदिवस अधिकच धोकादायक बनत चालली आहे. त्यामुळे आता या नदीकडे सरकारी यंत्रणा कधी लक्ष देतील? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.