रविंद्र साळवे लोकमत न्यूज नेटवर्कमोखाडा : गेल्या ३० आॅगस्ट रोजी कळमवाडी येथील सागर वाघ या कुपोषित बालकाचा बळी गेल्यानंतर मंत्री, नेते, लोकप्रतिनिधी यांनी धाव घेतली होती. आश्वासनांची खैरात केली होती. त्यातले काहीही झालेले नसून ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी मुंडे फाऊंडेशनतर्फे घोषित केलेली ५० हजारांची मदत आज नऊ महिने झाले तरी या परिवाराला मिळालेली नाही. त्यात सागरच्या आईने बाळाला नुकताच जन्म दिला असून ते ही कुपोषित आहे. घरात खायला दाणा नसल्यामुळे त्याला जगवायचे कसे असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. रोजगार नाही, हाती पैसा नाही त्यामुळे मृत्यू येण्याची वाट पाहण्यापलिकडे त्यांच्यापुढे कोणताही पर्याय उरलेला नाही.त्यामुळे आरोग्यमंत्री सावंत, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, खासदार वनगा व आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी ढाळलेले अश्रू मगरीचे ठरले आहेत. या महाभागांच्या दौऱ्यांमुळे येथील कुपोषणाचा प्रश्न सुटेल अशी अशा होती परंतु ८ ते ९ ते महिन्याचा कालावधी उलटूनही कुपोषणाचा प्रश्न जैसे थे च आहे. कुपोषण आटोक्यात येण्या ऐवजी कुपोषबळी ठरलेल्या सागर वाघ यांच्या कुटुंबियांच्या घरच्या परिस्थितीचे भीषण वास्तव पुन्हा चव्हाट्यावर आले आहे. आजही या कुटुंबीयांना घरात खायला काहीच नाही. अशा दाहकतेत सीता वाघ यांनी जन्माला घातलेल्या बालकाचे पालन पोषण कसे करायचे? असा प्रश्न ठाकला आहे. महावितरणाने वाघ यांना तातडीने पुरविलेल्या आलेल्या मीटर कनेक्शनचे एका महिन्याचे बिल चार हजाराचे पाठविल्याने ते भरायचे कसे असा प्रश्न आहे विशेष म्हणजे त्यांच्या घरात फक्त एक बल्ब आहे.
सागर वाघच्या परिवाराचे कुपोषण आजही सुरूच
By admin | Published: May 23, 2017 1:28 AM