ठाणे : महापालिका कंत्राटदाराच्या आत्महत्येला आर्थिक परिस्थिती कारणीभूत असल्याच्या मुद्यावर तपास यंत्रणा तूर्तास तरी ठाम नाही. त्याच्या मित्र मंडळीशी केलेल्या चर्चेतून ही माहिती समोर आल्याने आत्महत्येचे गूढ आणखी वाढले आहे.महापालिकेचे कंत्राटदार संकेत जाधव (वय ३६) यांनी रविवारी दुपारी स्वत:वर अॅटोमॅटीक पिस्तुलाने गोळ्या झाडून आत्महत्या केली. गायमुखजवळ कार रस्त्याच्या कडेला लावून त्यांनी छातीमध्ये तीन गोळ्या झाडून घेतल्या. तत्पूर्वी त्यांनी कार आतमधून लॉक केली होती. दुपारी ५.१५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. तत्पूर्वी ४ वाजताच्या सुमारास ते पाचपाखाडी येथील पसायदान सोसायटीतील राहत्या घरून बाहेर पडले. घोडबंदर रोडवरील गायमुखजवळ पोहोचल्यानंतर त्यांनी कार पुन्हा ठाण्याच्या दिशेने वळवली. रस्त्याच्या कडेला कार सुरूच ठेवून त्यांनी जीवनयात्रा संपवली.आर्थिक अडचणीतून प्रचंड नैराश्य आलेल्या नेत्यांनी टोकाचा निर्णय घेतल्याची चर्चा या पार्श्वभूमीवर सर्वत्र सुरू आहे. प्रत्यक्षात पोलीस यंत्रणेने या मुद्याला दुजोरा दिला नाही. आत्महत्येसारखा निर्णय घेण्याएवढ्या वाईट आर्थिक परिस्थितीला ते सामोरे जात होते, असे तूर्तास तरी दिसत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या संपर्कातील काही मित्र, कंत्राटदार आणि महापालिकेच्या अधिकाºयांशी पोलिसांनी चर्चा केली. त्यांनी केलेल्या काही कामांची देयकेही महापालिकेमध्ये सादर केली नसल्याचे पोलिसांना समजले. आयुष्य संपवण्याएवढी आर्थिक परिस्थिती बिकट असती, तर त्यांनी त्यांच्या कामांची देयके महापालिकेकडे सादर करून त्यासाठी किमान पाठपुरावा तरी केला असता, असे मत पोलिसांनी व्यक्त केले. त्यांच्या भावाचा पाणीपुरवठ्याचा व्यवसाय आहे. अतिशय मनमिळाऊ स्वभावाच्या संकेत यांना धूम्रपानाव्यतिरिक्त अन्य कोणतेही व्यसन नव्हते. दररोज रात्री ९ ते ९.३० वाजेपर्यंत ते घरी जायचे. वर्षभरापूर्वी ते पाचपाखाडी येथील पसायदान सोसायटीमध्ये वास्तव्यास गेले. तत्पूर्वी त्यांचे वास्तव्य याच भागात होते. पिस्टलच्या परवान्यावर त्यांच्या जुन्या घरचा पत्ता नमूद आहे. सोमवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. एकदोन दिवसांत कुटुंबीय आणि इतर संबंधितांची विचारपूस करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
संकेत जाधव यांच्या आत्महत्येचे गूढ कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2017 2:49 AM