ठाणे : सह्याद्री प्रतिष्ठान ठाणे जिल्हा आणि आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात ठाणे मुक्ती दिन साजरा करण्यात आला. यावेळी मुक्ती संग्रामात लढलेल्या शूरवीवीरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व मुक्ती संग्रामाच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
या कार्यक्रमाला जेष्ठ इतिहासकार व महाराष्ट्र् शासनाच्या दुर्गसंवर्धन समितीचे मुख्य सल्लागार पांडुरंग बलकवडे, सह्याद्री प्रतिष्ठानचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष आमदार संजय केळकर, सहयाद्री प्रतिष्ठानचे संस्थापक, महाराष्ट्र् शाषनाच्या दुर्गसंवर्धन समितीचे सदस्य व देशातील ज्यांनी १५०० किल्ले पाहण्याचा विश्वविक्रम केला ते श्रमिक गोजमगुंडे, जेष्ठ इतिहासकार सदाशिव टेटविलकर, ठाणे कारागृहाच्या मुख्य अधिकारी नितीन वायचाळ, नगरसेविका प्रतिभा मढवी, माजी उपमहापौर अशोक भोईर, डॉ. राजेश मढवी, सह्याद्री प्रतिष्ठानचे ठाणे जिल्हा अध्यक्ष महेश विनेरकर, उपाध्यक्ष ऍड. अमित पाटील, स्वप्नाली साळवी, योगेश बोरसे व ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सध्याचे ठाण्याचे मध्यवर्ती कारागृह हा ठाण्याचा किल्ला म्हणून ओळखला जातो. हा किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. किल्ला पोर्तुगीजांच्या जोखडीतून सोडविण्याकरिता बाजीराव पेशव्यांनी चिमाजी अप्पा यांना आदेश दिले. त्यावेळी चिमाजी अप्पा यांनी २७ मार्च १७३७ साली स्थानिकांच्या सहकार्याने या किल्ल्यावर चढाई केली आणि किल्ला पोर्तुगीज्यांच्या जोखडीतून सोडविला. ठाणे मुक्त केले. यामुळे ठाणेकरांच्या दृष्टीने २७ मार्च हा दिवस खुप महत्वाचा असतो. सह्याद्री प्रतिष्ठान ठाणे जिल्ह्याच्या वतीने व कार्याध्यक्ष आमदार संजय केळकर यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम गेली तीन वर्षे ठाणे मध्यवर्ती कारागृहात पार पडत असतो. या कार्यक्रमाला शेकडो ठाणेकर नागरिक उपस्थित असतात. यावेळी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष आमदार संजय केळकर यांनी कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत कार्यक्रमाची माहिती देऊन या मध्यवर्ती कारागृहात म्युरल चित्रांच्या माध्यमातून ठाणे मुक्ती दिनाचा संग्राम लवकरच येथील भिंतींवर उभारणार असल्याचीही माहिती दिली व आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले. तर पांडुरंग बलकवडे व सदाशिव टेटविलकर यांनी ठाणे मुक्ती दिनाचा संग्राम कसा घडला याबद्दल उपस्थितांना संपूर्ण माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सह्याद्री प्रतिष्ठानचे दिवा शहर अध्यक्ष ऍड. आदेश भगत यांनी केले.