- सदानंद नाईक
उल्हासनगर: भाजपानेमहापौरच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला महापौरपदापासून दूर ठेवण्यासाठी मोठी खेळी खेळण्यात आली आहे. उल्हासनगर महापौरपदाची निवडणूक उद्या (शुक्रवारी २२ नोव्हेंबर)ला होणार आहे. या निवडणुकीआधी साई पक्ष भाजपात विलीन झाला आहे. मात्र उद्या होणाऱ्या निवडणुकीत ओमी टीमचा पक्ष किंगमेकर ठरणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
भाजपातील ओमी टीम समर्थक सातपेक्षा जास्त नगरसेवक भूमिगत झाल्याने, भाजपा आघाडीतील तणाव वाढला होता. त्यामुळे साई पक्षाचे नगरसेवक भाजपात विलीनीकरण करण्याचे प्रयत्न सुरू केले होते. यानंतर आज साई पक्षाला भाजपात विलीन करण्यात आले. शिवसेनेला महापौर पदापासून दूर ठेवण्यासाठी भाजपाला या प्रयत्नाला यश आले खरे, मात्र ओमी टीमचे सात ते आठ नगरसेवक नाराज असल्याने ते कोणाला मतदान करणार त्यावर महापौर ठरणार असल्याने उद्या कोण महापौर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच महापौर पदाचा निवडणुकीत साई पक्षाचे जीवन इदनानी यांना महापौर पद मिळणार आहे. तसे संकेत माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले आहेत. ओमी समर्थक नगरसेवकांसह ३१ नगरसेवकांना व्हिप जारी केला आहे. व्हिप झुगारून मतदान केल्यास नगरसेवकांवर कारवाईचे आदेश रवींद्र चव्हाण यांनी दिले.
भाजप- ओमी टीमचे ३१ तर साई पक्षाचे १२ असे एकूण ४३ नगरसेवक भाजप आघाडीकडे आहेत. महापौर विजयी होण्याकरिता ४० नगरसेवकांची आवश्यकता आहे. विरोधी पक्षातील शिवसेनेकडे २५, राष्ट्रवादी काँग्रेस चार, रिपाइंचे तीन, काँग्रेस, पीआरपी व भारिपचे प्रत्येकी एक असे एकूण ३५ नगरसेवक आहेत.