- सदानंद नाईक उल्हासनगर : महापौर निवडणुकीच्या तोंडावर साई पक्षाचे माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपत विलीनीकरण होत आहे. मात्र साई पक्षाच्या काही नगरसेवकांत याबाबत नाराजी असून साई पक्षाचे प्रमुख जीवन इदनानी यांनी विलीनीकरणाची कबुली दिली आहे.उल्हासनगर महापौरपदाची निवडणूक शुक्र वारी २२ नोव्हेंबर रोजी दुपारी होत आहे. भाजप-ओमी टीमचे ३१ तर साई पक्षाचे १२ असे एकूण ४३ नगरसेवक भाजप आघाडीकडे आहेत. महापौर विजयी होण्याकरिता ४० नगरसेवकांची आवश्यकता आहे. विरोधी पक्षातील शिवसेनेकडे २५, राष्ट्रवादी काँग्रेस चार, रिपाइंचे तीन, काँग्रेस, पीआरपी व भारिपचे प्रत्येकी एक असे एकूण ३५ नगरसेवक आहेत. मात्र, भाजपतील ओमी टीम समर्थक सातपेक्षा जास्त नगरसेवक भूमिगत झाल्याने, भाजप आघाडीतील तणाव वाढला आहे. त्यामुळे साई पक्षाचे भाजपत विलीनीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. साई पक्षाच्या १२ पैकी काही नगरसेवक या निर्णयामुळे नाराज असून साई पक्षात फूट पडण्याची भीती आहे. भाजपतील ओमी टीम समर्थक नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असल्याने भाजप वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पालिकेवर भगवा फडकवण्यासाठी भाजपतील ओमी टीम समर्थक नगरसेवक फोडल्याची चर्चा आहे.शिवसेनेचा डाव मोडून काढण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. ओमी समर्थक नगरसेवकांसह ३१ नगरसेवकांना व्हिप जारी केला आहे. व्हिप झुगारून मतदान केल्यास नगरसेवकांवर कारवाईचे आदेश रवींद्र चव्हाण यांनी दिले. भाजपचा महापौर निवडून आणण्यासाठी चव्हाण गेल्या दोन दिवसांपासून शहरात ठाण मांडून बसले आहेत. ओमी टीम समर्थक नगरसेवक भाजप नेत्यांच्या संपर्कात येऊ नये, यासाठी शिवसेनेने खबरदारी घेतली आहे.
साई पक्षाचे भाजपत विलीनीकरण होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 12:40 AM