उल्हासनगर : साई पक्षाने काही अटीशर्तींवर युतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांना साथ देण्याचे जाहीर केले आहे. जीआयएस सर्वेक्षण ठेका रद्द करणे, कल्याण ते बदलापूर रस्त्याची पुनर्बांधणी, जीन्स कारखाने पुन्हा सुरू करणे आदी समस्या सोडवण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिल्यावर साई पक्षाने हा निर्णय घेतला.साई पक्षाचे उल्हासनगरात १२ नगरसेवक असून भाजप-ओमी टीमसोबत हा पक्षही महापालिका सत्तेत आहे. पक्षाचे प्रमुख जीवन इदनानी हे उपमहापौर असून त्यांना मानणारा एक गट शहरात आहे. ओमी टीम, रिपाइं व साई पक्षाच्या मागण्या सारख्याच असल्याने, त्यांच्या मागण्या निवडणुकीनंतर सोडवण्याचे आश्वासन पालकमंत्री एकनाथ शिंदे व राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले. भाजप-ओमी टीम व साई पक्षाची पालिकेत सत्ता आहे; मात्र पाणीटंचाई, रस्त्यांची दुरवस्था असून साफसफाईचा बोजवारा उडाला आहे. प्रचार करतेवेळी युतीने या मूलभूत समस्यांबाबत बोलावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.शहरात अनेक लहानमोठे कारखाने आहेत. जीन्स, प्लास्टिक कारखान्यांवर गंडांतर आल्याने, हजारो व्यापाऱ्यांसह ५० हजारांपेक्षा जास्त कामगारांनी शहरातून स्थलांतर केले आहे. कल्याण ते बदलापूर रस्त्याची पुनर्बांधणी अद्याप प्रलंबित असल्याने अपघातांत निष्पाप नागरिकांचे बळी जात आहेत. हे सर्व मुद्दे निवडणुकीत कितपत प्रभावी ठरतात, हे पाहणे महत्त्वाचे राहणार आहे.
लोकसभेसाठी उल्हासनगरात साई पक्षाची महायुतीला साथ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 1:15 AM