कोरोना आपत्तीमुळे महापालिकेचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घटले आहे. अशा परिस्थितीत काटकसर करण्याची गरज अर्थसंकल्पाच्यावेळी व्यक्त झाली होती. त्याचबरोबर नगरसेवकांचा निधी, दिव्यांग व विधवा महिलांना अनुदान आदीच्या खर्चात कपात झाली. मात्र, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांनी महापालिकेत उधळपट्टी सुरू ठेवली आहे. काहीही गरज नसताना महापौर नरेश म्हस्के यांना १९ लाख ६७ हजार रुपयांची ह्युंदाई एलंत्रा, उपमहापौर पल्लवी कदम, सभागृहनेते अशोक वैती, स्थायी समितीचे सभापती संजय भोईर यांना प्रत्येकी दहा लाख ९३ हजारांची होंडा सिटी, माजिवडा मानपाडा प्रभाग समितीचे सभापती भूषण भोईर, वर्तकनगर प्रभाग समितीच्या सभापती राधिका फाटक आणि महिला-बालकल्याण समितीच्या सभापती राधाबाई जाधवर यांना स्विफ्ट डिझायर दिली जाणार आहे. त्याची एकत्रित किंमत १८ लाख ४५ हजार रुपये आहे. या संदर्भात स्थायी समितीत बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर केला. यामुळे या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांकडेही दाद मागितली आहे.
पदाधिकाऱ्यांच्या वाहन खरेदी विरोधात मुख्यमंत्र्यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 4:39 AM