कसारा : विद्यार्थ्यांमधील नवनिर्मितीला चालना देऊन कौशल्य, समीक्षात्मक विचार, वैज्ञानिक वृत्ती, संभाषणकौशल्य, संविधानिक मूल्यांची रुजवणूक करतानाच कृतियुक्त शिक्षणही त्यांना समजावे यासाठी राज्यातील ५०० शाळांची आदर्श शाळा म्हणून निवड झाली आहे. यात शहापूर तालुक्यातील खर्डी येथील जिल्हा परिषदेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेचीही निवड झाली आहे.
शाळेत शिकणाऱ्या ४०० च्यावरील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्यासाठी इमारतीची गरज असून त्यासाठी खर्डीतील सरकारी जमिनीची मागणी दोन वर्षांपासून केली जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात फाइल पडून असल्याने जागेमुळे काम रखडले आहे. याबाबत पालकांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची आसनगाव येथे निवेदन देऊन शाळेसाठी जमीन देण्याची मागणी केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी पोलीस पाटील श्याम परदेशी, शिवसेनेचे गणेश राऊत, खर्डीचे माजी सरपंच प्रशांत खर्डीकर, पालक संघाचे सदाशिव सरखोत, पांडुरंग काळे, सोमनाथ म्हस्कर, अमोल आपटे, पपू पवार, मुख्याध्यापक सुधीर भोईर उपस्थित होते.