ठाणे : चंदनवाडी शिवसेना शाखेत झालेल्या लसीकरण शिबिराला परवानगी देणाऱ्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांनी पत्रव्यवहार करून थेट पंतप्रधानांना साकडे घातले आहे.
केंद्राकडून माेफत मिळालेल्या लसींच्या माध्यमातून शिवसेनेच्या एका लोकप्रतिनिधीने लसीकरण शिबिराच्या ठिकाणी शिवसेनेचे झेंडे व बॅनर झळकवून राजकीय अजेंडा राबवल्याचा आरोप पवार यांनी केला आहे. या प्रकाराला महापालिकेतील अधिकाऱ्यांची साथ मिळाल्याचेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे. चंदनवाडी येथील शिवसेना शाखेत २३ जूनला हे लसीकरण शिबिर झाले हाेते. या शिबिरासाठी पालिकेने लस पुरविली हाेती, मात्र शिबिराच्या प्रवेशद्वारावर महापालिकेचा छोटा लोगो लावलेला हाेता, तर तेथे लागलेल्या बॅनरवर शिवसेना नेत्यांची छायाचित्रे व मंडपात शिवसेनेचे झेंडे लावल्याबाबत त्यांनी या पत्रात आक्षेप नाेंदवला आहे. पालिकेची यंत्रणा राबवून घेतलेल्या या शिबिरात शिवसेनेच्या मर्जीतील नागरिकांना लस दिल्याचे पवार यांचे म्हणणे आहे. तसेच, को-विन ॲपवर आगाऊ अपॉईटमेंटही दिल्या गेल्या नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शिवसेनेने महापालिकेतील सत्तेचा गैरवापर करून शिवसेनेच्या चंदनवाडी शाखेत लसीकरण शिबिर घेतले. या शिबिराला परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून अधिकाराचा गैरवापर करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडेही तक्रारी केल्याचे त्यांनी सांगितले.