ठाणे : जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत देण्यात येणारे निवृत्तीवेतन व कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांचे निवृत्ती वेतन व इतर लाभ हे रिझर्व्ह बँकेतून थेट निवृत्तीवेतन धारकांच्या बँक खात्यात जमा करण्याची कार्यप्रणाली सुरू करण्यात येणार आहे. यासाठी ई-कुबेर प्रणाली विकसित करण्यात आलेली असून त्याद्वारे एप्रिलपासून निवृत्ती वेतन व निवृत्ती वेतनविषयक लाभ देण्यात येणार असल्याचे जिल्हा कोषागार कार्यालयाने सांगितले.
वेतनविषयक लाभ, निवृत्ती वेतन वेळेत व पारदर्शक पध्दतीने निवृत्ती वेतनधारकांना प्राप्त व्हावेत, यासाठी ठाणे जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत ई- कुबेर प्रणाली राबविण्यात येत आहे. ठाणे कोषागार कार्यालयात निवृत्ती वेतन व कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांनी निवृत्ती वेतन सुरु करताना ज्या बँकेचे तपशिल दिलेले होते, त्याच बॅंक खात्याच्या आय.एफ.एस.सी. कोड नुसार निवृत्तीवेतन जमा होणार आहे. त्यामुळे कोषागाराच्या पूर्व परवानगीशिवाय निवृत्तीवेतन व कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनी त्यांच्या बँक खात्यात बदल करु नये, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी (प्रभारी) सुबोध राऊत यांनी केले आहे.
ज्या निवृत्ती वेतनधारकांनी जिल्हा कोषागार कार्यालयाला न कळविता परस्पर बँक अथवा बॅंक शाखा बदलून घेतली, असेल अशा निवृत्ती वेतनधारकास निवृत्ती वेतनाच्या प्रदानास अडचण निर्माण होईल. त्यामुळे निवृत्ती वेतनधारकांनी त्यांचे मूळ बँक खाते ज्या ठिकाणी असेल त्या बॅंक खात्याचे आय.एफ.एस. सी. कोड नुसार बँक खाते सुरु ठेवावे. भविष्यात निवृत्तीवेतनाबाबत अडचणी निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी निवृत्तीवेतनधारकांची राहील, अशी माहिती राऊत यांनी पत्रकाद्वारे कळविली आहे.