लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : टोलनाक्यावरील कंत्राटी कामगारांना त्यांचे रखडलेले वेतन सोमवारी मिळाले नाहीतर टोल नाक्यावर धिंगाणा घालू असा कडक इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुलुंड-ठाणे दरम्यान असलेल्या टोल ठेकेदाराला दिला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून वेतन रखडल्याने येथील कर्मचारी हवालदिल झाले आहेत.
ठाण्यातील मुलुंड टोल नाक्यावर कंत्राटी पद्धतीने कित्येक कर्मचारी काम करीत आहेत. यातील १५ ते २० कर्मचार्यांना गेल्या दोन महिन्यांचा पगार ठेकेदाराने दिलेला नाही. त्यामुळे या मुलांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे . सामान्य कुटूंबातील हे कर्मचारी गेल्या एक आठवडयापासून रोज ठेकेदाराच्या कायार्लयावर दिवसदिवसभर पगाराच्या अपेक्षेने प्रतिक्षा करीत बसले होते. परंतु ठेकेदार पगार देत नसल्याने हे कर्मचारी हवालदिल झाले. खिशात पैसे नाही त्यामुळे या कर्मचार्यांनी मुलुंड चेकनाक्यावरून चालत रविवारी घंटाळी येथील मनसेचे कार्यालय गाठले.
याठिकाणी उपस्थित असलेले मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांना ठेकदाराकडून पगार मिळत नसल्याची कैफियत त्यांनी मांडली. याची त्वरित गांभीर्याने दखल घेत मनसेचे मोरे यांच्यासह मनसे वाहतूक सेना ठाणे शहर अध्यक्ष संदीप साळुंखे,विभाग अध्यक्ष निलेश चव्हाण व मनसे कार्यकर्त्यांनी मानपाडा वरूण गार्डन येथील ठेकेदाराच्या कार्यालयाला धडक दिली. परंतू याठिकाणी ठेकेदार नव्हता. फोनवरून त्याच्याशी संपर्क साधत मनसेचे मोरे यांनी थेट इशारा देत या मुलांचे पगार सोमवारी झाले नाहीतर मुलुंड टोल नाक्यावर धिंगाणा घालू आणि त्यानंतर जे काय घडेल याला ठेकेदार जबादार असेल, असा सज्जड इशारा दिला. आता या इशार्यानंतर सोमवारी या कर्मचार्यांना पगार मिळेल असे आश्वास ठेकेदाराने दिले आहे.