ठाणे : दसऱ्याच्या सणानिमित्त पूजेला, तोरणाकरिता सर्वाधिक मागणी असलेल्या झेंडुच्या फुलांचे दर गेल्या वर्षाच्या तुलनेत गडगडले. गेल्यावर्षी १०० रूपयांच्या घरात असलेला गोंडा ६० ते ८० रूपयांदरम्यान असल्याने ठाण्यात सोमवारी तब्बल ३०० टन झेंडूच्या फुलांची विक्री झाली, अशी माहिती फूल विक्रेत्यांनी दिली. रविवारपासूनच ठाणेकरांनी दसऱ्याची जय्यत तयारी सुरू केली होती. ग्राहकांची मागणी पूर्ण करण्याकरिता एक दिवस अगोदर फुले विक्रीसाठी येतात. सोमवारी बाजारपेठांबरोबरच शहरातील चौकाचौकात फुलांची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू होती. सकाळी सात वाजल्यापासून ठिकठिकाणी झेंडूच्या केशरी व पिवळ्या फुलांच्या राशी घेऊन विक्रेते दिसून येत होते. दुपारनंतर फुलांच्या खरेदीने जोर धरला. रात्री उशीरापर्यंत खरेदी सुरू होती. ठाण्यातील राघोबा शंकर मार्ग, दत्त मंदिर, स्टेशन रोड या ठिकाणी भिवंडी, गणेशपुरी, वाडा येथील छोट्या खेड्यांतून आलेले विक्रेते फुलांबरोबरच आपट्याची पाने, आंब्याची डहाळे, सुपारीचे फुले, लिंबाचा पाला, भाताचे कणिस, केळीचे पान, झेंडुची तोरणं आदींची विक्री करताना दिसत होते. मंगळवारी सकाळपर्यंत ही खरेदी सुरू राहील, असे विक्रेत्यांनी सांगितले. सोमवारी केशरी गोंड्याची २०० टन तर पिवळ्या गोंड्याची १०० टन उलाढाली झाली, असे फुल विक्रेते संजय ठसाळे यांनी सांगितले. दर कमी झाल्याने ग्राहक पाच किलोपर्यंत फुलांची खरेदी करीत आहेत. आवक भरपूर झाल्याने दरात घट झाल्याचे त्यांनी सांगितले.
ठाण्यात तब्बल ३०० टन झेंडुच्या फुलांची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2016 2:47 AM