मीरा रोड : दहावी व बारावीची राज्य शिक्षण मंडळाची बनावट गुणपत्रिका बनवून एक ते तीन हजारांत विकणाऱ्या दोघा भावांना ठाणे ग्रामीण पोलिसांनी मीरा रोड येथून अटक केली. त्यांच्याकडून पाच बनावट गुणपत्रिका जप्त करण्यात आल्या आहेत.
ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजीराव राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे वाचक पोलीस निरीक्षक मनोजकुमार म्हात्रे, सहायक निरीक्षक विश्वास पाटील यांच्या पथकाने मीरा रोडच्या शांती शॉपिंग सेंटरमधील एका गाळ्यात धाड टाकून ही कारवाई केली. या गाळ्यात बनावट गुणपत्रिका बनवून दिल्या जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी बनावट ग्राहक त्यांच्याकडे पाठवले. त्यावेळी राजेश गोपाळ रेशमलाल आणि त्याचा भाऊ तिलक यांनी बनावट ग्राहकाला हजार रुपये घेऊन काही वेळातच दहावीची हुबेहूब बनावट गुणपत्रिका दिली. खात्री पटताच दबा धरून असलेले म्हात्रे व पथकाने राजेश व तिलक या दोघांना अटक केली. याप्रकरणी नयानगर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे न्यायालयाने दोघा आरोपींना १२ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राहुल अतिग्रे पुढील तपास करत आहेत. आरोपी बनावट गुणपत्रिका कशा व कुठे छापत होते, यापासून आतापर्यंत किती गुणपत्रिका छापल्या, आदींची उकल चौकशीत होण्याची शक्यता आहे.