ठाणे : साडेतीन मुहुर्तापैकी एक मानला जाणाऱ्या दसऱ्याची दिवशी नवीन घर खरेदीला अनेकांनी पसंती दिली आहे. त्यानुसार ठाण्यात याच मुहुर्तावर तब्बल तीन हजार घरांची विक्री झाल्याची आनंददायी माहिती पुढे आली आहे. यातही घोडबंदर भागाला पुन्हा एकदा ग्राहकांनी पसंती दिल्याचे समोर आले आहे. विकासकांनी गृहखरेदी करणाऱ्यांसाठी वेगवेगळ्या सवलती दिल्याने ग्राहकांनी देखील या सवलीतांचा फायदा घेत गृहखरेदीला पंसती दिल्याचे दिसून आले आहे.
दसऱ्याच्या मुहुर्तावर दरवर्षी प्रत्येक नागरीक काहीना काही नवीन वस्तु खरेदी करत असतो. त्यात आपल्या स्वप्नातील घर घेण्यासाठी अनेक पर्यायही शोधत असतो. त्यातही घोडबंदरला अधिक पर्याय ग्राहकाला उपलब्ध असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. आपल्या स्वप्नातील घर कसे असावे, त्याला गॅलरी, छानसे उद्याने विविध स्वरुपाच्या कोण कोणत्या सुविधा आहेत, याची माहिती देखील त्याला मिळते. तसेच घराचे अनेक पर्यायही उपलब्ध असल्याने याकडे अधिक कल असल्याचे दिसून आले आहे. त्यातही वन बीएचके पेक्षा टु बीएचके घरांना यंदा अधिक पसंतीचा कौल दिला गेल्याचेही विकासक सांगत आहेत.
ठाण्यात आजच्या घडीला घोडबंदर असेल, माजिवडा, कळवा, पोखरण रोड नं. २ किंवा ठाण्याच्या मुख्य भागातही तब्बल ५ कोटी स्केअर फुटांचे बांधकाम सुरु असून दसऱ्याच्या मुहुर्तावर तब्बल ३ हजार घरांचे बुकींग झाले असल्याची माहिती एमसीएचआयचे ठाणे अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी दिली. कोरोनानंतर आता कुठे बांधकाम व्यावसायिकही सावरत आहेत. परंतु कोरोना ओसरल्यावरही एवढा प्रतिसाद दिसून आला नव्हता. गुढीपाडव्याला मागील वर्षी ३०० घरांचे बुकींग झाले होते. त्यानंतर दसºयालाही फारसा प्रतिसाद दिसून आला नाही. परंतु या वर्षी ग्राहकांचा गृह खरेदीकडे अधिक कल असल्याचे दिसत आहे.ठाण्यात ग्राहकांना घरांचे अनेक पर्याय विकासकांनी उपलब्ध करुन दिले आहेत. त्यात वन बीएचके, टी बीएचके, थ्री बीएचके अगदी फाईव्ह बिएचके पर्यंतचे लॅव्हीश फ्लॅटही उपलब्ध असल्याची माहिती विकासकांनी दिली. त्यात घरातील सदस्यांची संख्या वाढत असल्याने ग्राहक टू बीएचके फ्लॅटला अधिक पसंती देत असल्याचेही मेहता यांनी सांगितले.
त्यातही घर खरेदी करतांना ईएमआय भरण्याचे विविध पर्याय देतांनाच यामध्ये मुद्रांक शुल्क सवलत, जीएसटी सूट, पार्किंगसाठी मोफत जागा, घराचा ताबा घेताना १० टक्के आणि उर्वरित रक्कम भरणे, घर खरेदी करणे आणि फ्लॅटचे भाडे मिळणे अशा अनेक फायद्यांचा समावेश आहे. शिवाय कुठे फोन, कुठे एसी, कुठे फुल्ली फर्नीश प्लॅट अशा भन्नाट ऑफरही विकासकांकडून देण्यात आल्या आहेत. शिवाय सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेल या दरापासून अगदी लॅव्हीश फ्लॅटही उपलब्ध आहे. घरांच्या किमंती देखील ४५ लाखापासून ते अगदी दोन ते तीन कोटी पर्यंत असल्याचे दिसून आले आहे. ४५ लाखांच्या घरांसाठी घोडबंदरचे शेवटचे टोक उपलब्ध आहे. मेट्रो सुरु होणार असल्याने ग्राहकही अगदी शेवटच्या टोकालाही पसंतीचा कौल देत असल्याचे विकासक सांगतात.