कल्याण : कोणत्याही प्रकारचा परवाना नसताना दुकान थाटून फायटर, तलवारी आणि गुप्त्यांसारख्या शस्त्रांची विक्री करणाऱ्या मानपाडा रोड परिसरातील एका दुकानदारास कल्याण गुन्हे शाखेने सोमवारी अटक केली. त्याच्या दुकानातून तब्बल १७0 शस्त्रे पोलिसांनी हस्तगत केली. धनंजय कुलकर्णी हे आरोपी दुकानदाराचे नाव असून, मंगळवारी न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
मानपाडा रोड परिसरात असलेल्या महावीर नगरातील अरिहंत इमारतीमध्ये आरोपी धनंजय कुलकर्णी याचे तपस्या हाऊस आॅफ फॅशन नावाचे दुकान आहे. या दुकानात बंदी असलेल्या शस्त्रांचा साठा असल्याची माहिती कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक संतोष शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक निलेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक शरद पंजे, दत्ताराम भोसले, राजेंद्र घोलप, राजेंद्र खिल्लारे, प्रकाश पाटील, हरिश्चंद्र बांगारा, राहुल ईशी यांच्या पथकाने सोमवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास या दुकानावर छापा टाकला. पोलिसांनी दुकानाची झडती घेतली असता, दुकानात ६२ स्टील तसेच पितळी धातूचे फायटर्स, ३८ बटन चाकू, २५ चॉपर्स, १० तलवारी, ९ कुकºया, ९ गुप्त्या, ५ सुरे, ३ कुºहाडी, १ कोयता आणि १ एयरगन आढळून आली.
पोलिसांनी या शस्त्रांसह मोबाईल आणि रोख रक्कम असा सुमारे १ लाख ८६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.अशा प्रकारच्या बेकायदा शस्त्रविक्रीमुळे गुन्हेगारीस प्रोत्साहन मिळते. गल्लीबोळातील गुंड या शस्त्रांचा लोकांना मारहाण करण्यासाठी आणि लुटमार करण्यासाठी सर्रास वापर करतात. त्यामुळे आरोपीकडून विकत घेतलेल्या शस्त्रांचा वापर कधी आणि कोणत्या गुन्ह्यांसाठी झाला, या दिशेनेही पोलीस या प्रकरणाचा तपास करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.परराज्यांतून केली तस्करीटिळकनगर परिसरातील न्यू दीपज्योत इमारतीमध्ये राहणारा धनंजय गेल्या ८-९ महिन्यांपासून तपस्या हाऊस आॅफ फॅशन या दुकानात शस्त्रास्त्रांची विक्री करीत होता. ही शस्त्रे त्याने मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटबरोबरच पंजाब आणि राजस्थानमधून आणली आहेत.