लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सोन्याचे दागिने आणि वाहन खरेदी करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. त्यात यंदा १२ ते १६ नोव्हेंबर या चार दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात तीन हजार ५१ वाहनांची विक्री झाली आहे. यामध्ये दुचाकींची संख्या सर्वाधिक असली तरी १०० हून अधिक जड-अवजड मालवाहू वाहनांचीही विक्री झाली आहे. या वाहनविक्रीतून ठाणे, कल्याण आणि नवी मुंबई या तीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना सुमारे १० कोटी ६९ लाख ५४ हजार रुपयांचा महसूल मिळाला आहे.
दसऱ्याच्या मुहूर्तापासून तेजीत आलेल्या जिल्ह्यातील वाहनविक्रीच्या व्यवसायात दिवाळीच्या मुहूर्तावर मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी केलेल्या टाळेबंदीमुळे वाहनविक्रीवर मोठा परिणाम झाला होता. ती बंद असल्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयांच्या महसुलातही मोठी घट झाली होती. मात्र, टाळेबंदीत शिथिलता आल्यामुळे वाहनविक्रीचा व्यवसायही हळूहळू पूर्वपदावर येऊ लागला आहे. गेल्या महिन्यात दसऱ्याच्या मुहूर्तावर जिल्ह्यात एक हजार ८४ वाहनांची विक्री झाली होती. यातून ठाणे, कल्याण आणि नवी मुंबई या तीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना सव्वादोन कोटींचा महसूल मिळाला होता. दिवाळीच्या मुहूर्तावरही या व्यवसायात मोठी वाढ झाली असून १२ ते १६ नोव्हेंबर या चार दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यात तीन हजार ५१ वाहनांची विक्री झाली. त्यामध्ये कल्याण उपप्रादेशिक क्षेत्रात सर्वाधिक एक हजार ९१७ वाहनांची विक्री झाली असून कार्यालयाला तीन कोटी ९१ लाख ९३ हजार ९७० रुपयांचा महसूल मिळाला आहे. ठाणे आरटीओ कार्यालयात ६२७ वाहनांच्या विक्रीची नोंदणी झाली असून चार कोटी ६२ लाख ५१ हजार ५६ रुपयांचा महसूल, तसेच नवी मुंबई आरटीओ क्षेत्रातून ५०७ वाहनांची विक्री झाली असून कार्यालयाला दोन कोटी १५ लाख ९ हजार ५६६ रुपयांचा महसूल मिळाला आहे.
सर्वाधिक दुचाकी गाड्यांची विक्रीदिवाळीत विक्री झालेल्या तीन हजार ५१ वाहनांमध्ये सर्वाधिक दोन हजार ३६६ दुचाकी आणि ५१५ चार चाकी वाहनांचा समावेश आहे. तर १०० हून अधिक जड-अवजड मालवाहू वाहनांची विक्री झाली आहे.