लोकमत न्यूज नेटवर्क मुंब्रा : दोन धर्मांमध्ये आग लावणारे हात दोन्हींकडे आहेत. परंतु, जोपर्यंत सलीमसारखे शहजादे या देशात आहेत, तोपर्यंत हा देश तुटणार नाही, असा ठाम विश्वास व्यक्त करतानाच सलीमने स्वत:चा जीव धोक्यात घालून अतिरेक्यांच्या गोळीबारातून ५० भाविकांचे प्राण वाचवण्याची मोलाची कामगिरी केली आहे. अशा सलीमचा देशाला अभिमान वाटतो आहे. सारा देश त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करीत आहे. अशा वेळी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सलीमची दखल घेऊ नये, हे भारतासारख्या प्रगल्भ देशाच्या प्रधानमंत्र्यांना न शोभणारे आहे, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली. मुंब्य्रात त्यांच्या हस्ते सलीम शेखचा सत्कार करण्यात आला, त्या प्रसंगी ते बोलत होते. आज सलीम हा देशातील सर्वात मोठा तारा बनला आहे. देशामधील वातावरण खराब होत चालले असतानाच त्याने ही कामगिरी करून दाखवली आहे. मुस्लिमांना देशप्रेमाचे प्रमाणपत्र मागणाऱ्यांच्या कानशिलात लगावली आहे, असे सांगून शोध घेतला तर असे सलीम घराघरांत आहेत. सलीमचा सत्कार करताना या देशात सर्वधर्मसमभाव समजणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा सत्कार होत असल्याचेही ते म्हणाले. सलीमने अतिरेक्यांच्या होत असलेल्या गोळीबारात ५० जणांचे प्राण वाचवले आहेत.ज्या व्यक्तीने स्वत:चा जीव धोक्यात घालून ५० जणांचे प्राण वाचवले, त्या सलीम शेखला यापुढे शहजादा सलीम म्हणून ओळखले जावे. कारण, त्याचे काम रक्षण करणाऱ्या खऱ्या शहजाद्यासारखेच आहे, असे सांगून मुस्लिमांसाठी गुण्यागोविंदाने राहणारा आणि त्यांच्या हिताचे रक्षण करणारा हिंदुस्थानसारखा दुसरा देश जगात नसल्याचे प्रतिपादन प्रख्यात गायिका, अभिनेत्री सलमा आगा यांनी केले. या वेळी त्यांच्या हस्ते सलीमला एक लाखाचा धनादेशही देण्यात आला. त्यासोबत जगभरात मुस्लिमांना राहण्यालायक कुठला देश असेल, तर तो हिंदुस्थान होय, असेही ते म्हणाले.
अमरनाथ यात्रेकरूंचे प्राण वाचवणाऱ्या सलीमचा मुंब्य्रात झाला सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 6:28 AM