ठाणे: एका खंडणीखोरांच्या टोळीला कंटाळून सलून व्यावसायिक मनिष शर्मा यांनी आत्महत्या केल्याची घटना लोकमान्यनगर येथे अलिकडेच घडली होती. या घटनेचा निषेध करण्यासाठी तसेच खंडणीखोर आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी मुंबई ठाण्यातील नाभिक संघटनेच्या व्यावसायिकांनी बहुसंख्येने एकत्र येत सोमवारी पोलिस आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला होता. दरम्यान, आपल्या मागण्यांचे निवेदन या संघटनेने जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनाही दिले.
पोलिस आयुक्त जयजित सिंग, जिल्हाधिकारी आणि वागळे इस्टेट परिमंडळाचे पोलिस उपायुक्त अमरसिंग जाधव यांना नाभिक संघटनेने दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, लोकमान्यनगर येथील स्थानिक सलून व्यावसायिक शर्मा यांनी खंडणीखोर गुंडांच्या त्रासाला कंटाळून ३१ जानेवारी २०२३ रोजी आपल्या दुकानातच आत्महत्या केल्यामुळे त्यांचे कुटुंबीय उघड्यावर पडले आहे. या घटनेतील पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली असली तरी उर्वरित अन्य एका आरोपीलाही अटक करुन सर्वांवर कडक कारवाई केली जावी. दिवसेंदिवस राज्यभरात शांत,संयमी सलून व्यवसायिकांवरील हल्ले आणि समाजकंटकांचा त्रास वाढत आहे. सरकारने अशा अनिष्ट प्रवृत्तींना वेळीच आवर घालून कडक उपाययोजना करावी आणि सलून व्यवसायिक कै.मनिष शर्मा यांच्या कुटुंबियांना न्याय व शासकीय सहायता निधीतून आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी केली.
राज्यभरातून ४०० व्यावसायिकांची उपस्थिती-यावेळी मुंबई, ठाणे जिल्ह्यासह पालघर, पुणे, नगर ,उत्तर प्रदेश, राजस्थान येथूनही नाभिक संघटनांचे ४०० प्रतिनिधी या निषेध मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी जननायक करपुरी ठाकूर समाज, सविता संघ, संत सेना पुरोगामी संघ ,डोंबिवली नाभिक संघ, पालघर नाभिक संघ, जनसेवा राष्ट्रीय पक्ष, स्वतंत्र मजदुर युनियन, एस बी पी बदलापूर शाखा, एसबीपी महाराष्ट्र कोर कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते. असोसिएशनचे कायदे सल्लागार शैलेश कदम यांच्यासह महाराष्ट्र अध्यक्ष दीपक यादव, संस्थापक अध्यक्ष दत्तात्रय चव्हाण असोसिएशनचे महाराष्ट्र प्रभारी उदय टक्के यांनी अरुण जाधव, माधव गडेकर, संजय पंडित, सचिन कुटे, विलास साळुंखे आदींनी मार्गदर्शन केले. दरम्यान, शर्मा आत्महत्या प्रकरणात सचिन मयेकर, धीरज वीरकर, जय परब, रोहित गंगणे आणि चेतन पाटील अशा पाच जणांना अटक केली असून उर्वरित वैभव विरकर याचाही शोध घेण्यात येत असल्याची माहिती वर्तकनगर पोलिसांनी दिली.