कल्याण : १७ व्या शतकातील भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानले जाते. त्यामुळे शुक्रवारी नौदल दिनानिमित्याने सोशल मीडियावरून महाराजांना वंदन करणाऱ्या पोस्ट, फोटो अपलोड करण्यात आल्या.
दरवर्षी ४ डिसेंबर रोजी भारतीय नौदल दिन साजरा केला जातो. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात भारतीय नौदलाने मिळवलेल्या विजयाची आठवण म्हणून ४ डिसेंबर रोजी नौदल दिन साजरा करण्यात येतो. यादिनाचे औचित्य साधून ट्विटर, फेसबुक, व्हाट्सअँपच्या माध्यमातून भारतीय नौदल, नेव्ही डे, छत्रपती शिवाजी महाराज असे हॅशटॅग वापरून मेसेज व्हायरस केले जात होते.
छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी आणि कौशल्याच्या बळावर समुद्र सुरक्षिततेचे महत्त्व ओळखून २४ ऑक्टोबर १६५७ रोजी मराठा आरमार दलाची ( इंडियन नेव्ही ) स्थापना केली. 'ज्याचे आरमार त्याचा समुद्र' हे लक्षात घेऊन समुद्रावर वर्चस्व निर्माण करायचे असेल आणि समुद्र जिंकायचे असेल तर, आरमाराची आवश्यकता असल्याचे महाराजांना वाटले. पोर्तुगीज, इंग्रज आणि सिद्दी यांच्या आक्रमणांपासून वाचवायचे असेल तर, स्वतःचे आरमार हवे, हे शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेच्या वेळीच ओळखले होते.
दूरदृष्टी, नियोजन आणि व्यापाराची दृष्टी समोर ठेवून प्रतिकूल परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार यशस्वीपणे बांधले. शिवाजी महाराजांनी कल्याण, भिवंडी आणि गोवा या शहरांमध्ये लढाऊ नौदल तसेच व्यापार उभारण्यासाठी जहाजे बांधली. दुरुस्ती, साठवण आणि निवारा यासाठी त्यांनी बरेच समुद्री किल्ले आणि तळ बांधले. खंबायतच्या आखातापासून त्रावणकोर, कोचीनपर्यंतची सागरी सत्ता काबीज करून मराठ्यांचे वर्चस्व महाराजांनी स्थापित केले. त्यामुळेच नौदल दिनानिमित्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचा जयजयकार करण्यात आला.