कल्याण : कोविड कालावधीत सर्व डॉक्टरांनी केलेल्या कार्याला माझा सलाम आहे. या साथीच्या आजारामध्ये चांगले निर्णय घेण्यासाठी डॉक्टरांनी आम्हाला मार्गदर्शन करावे, असे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले.
राज्यात कोरोनाची तिसरी लाट मुलांसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता असल्यामुळे शनिवारी रात्री आयएमए कल्याण आणि कल्याण डोंबिवली महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पेडायाट्रिक कोविड या विषयावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या वेबिनारमध्ये टाेपे बोलत होते. हे मार्गदर्शन देशात सर्वांना उपयोगी पडेल. त्याचप्रमाणे वेबिनारमधील उपयुक्त मुद्दे सरकारकडे पाठवा, असेही ते यावेळी म्हणाले. सध्या पोस्ट कोविड रुग्णांत म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव दिसत आहे. या आजारासाठी लागणारे ॲम्फोटेरिसिन हे औषध दोन दिवसांत महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध होईल, असेही ते यावेळी म्हणाले. या वेबिनारमध्ये नवजात तज्ज्ञ डाॅ. राहुल यादव, बालरोग संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉक्टर तनू सिंघल, बालरोग तज्ज्ञ सल्लागार डॉ. परमानंद आंदणकर यांनी मुलांमध्ये दिसून येणारी कोविडची लक्षणे, त्यावरील उपाययोजना, कोविडग्रस्त गरोदर माता, त्यांचे लसीकरण या विषयांबाबत उपस्थित डॉक्टरांना मोलाचे मार्गदर्शन केले. संभाव्य तिसऱ्या लाटेत मुलांना कोविडच्या संभाव्य लाटेचा सामना करावा लागू नये, यासाठी या वेबिनारचे आयोजन केल्याची माहिती आयएमए कल्याणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील यांनी यावेळी दिली. कल्याण - डोंबिवलीतील सर्व वैद्यकीय संघटनांनी कोविड कालावधीत पालिकेला फार मोलाची मदत केल्याबाबत आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी संबंधितांचे आभार मानले. या वेबिनारमध्ये देशभरातील सुमारे ७०० डॉक्टर, बालरोगतज्ज्ञ सहभागी झाले होते. वेबिनार यशस्वी करण्यासाठी आयएमए कल्याणचे अध्यक्ष डॉ. पाटील यांच्यासह डॉ. इशा पानसरे, डॉ. आनंद लीटकर, डॉ. गिरीश भिरुड, डॉ. सोनाली पाटील, डॉ. राजेश राघवराजू, डॉ. राजेश्वर वानखेडे, डॉ. आशिष पाटील आदींनी विशेष परिश्रम घेतले.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------