ठाणे : घरी एका कोपऱ्यात पडून राहिलेल्या शिडीचा वापर ठाण्यातील प्रसिद्ध भित्तीचित्रकार शैलेश साळवी यांनी पर्यावरणासाठी केला आहे. या लाकडाच्या शिडीवर त्यांनी झाडांना घर दिले असून नव्या वर्षात झाडे जोपासण्याचा त्यांनी संकल्प केला आहे. शिडीप्रमाणे आपले संकल्पही उंचच उंच जावे, असा त्यांचा निर्धार आहे.
साळवी हे भित्तीचित्रकार असल्याने त्यांच्या क्षेत्रात शिडी हा अविभाज्य घटक आहे. भित्तीचित्र करताना त्यांना ती वापरणे अत्यावश्यक असते. त्यांच्या घरात फार वर्षांपूर्वी लाकडाची शिडी होती. कालांतराने तिची जागा ॲल्युमिनियमच्या शिडीने घेतल्याने जुनी शिडी एका कोपऱ्यातच पडलेली असायची. लॉकडाऊनकाळात आपला वेळ सत्कारणी लागावा आणि आपला खंडित झालेला छंद नव्याने जोपासता यावा, म्हणून त्यांनी या शिडीला झाडांचे घर करण्याचे ठरविले.
आपली सहकारी लाजरी खेडेकर हिच्या सहकार्याने तिच्यावर त्यांनी रंगरंगोटी केली. त्यानंतर झाडांना आधार मिळावा म्हणून प्रत्येक पायरीवर ट्रे बांधले आणि मग त्यावर त्यांनी झाडे ठेवून ती शिडी सुशोभित केली. लॉकडाऊनकाळात त्यांनी घरात २५ झाडे लावली होती. यात फुलझाडे, फळझाडांचा समावेश आहे. या शिडीवर त्यांनी १२ शोभेची झाडे लावली.
झाडे लावण्याची साळवी यांना लहानपणापासून आवड होती. लॉकडाऊनचा काळ त्यांनी या छंदासाठी सत्कारणी लावला. ही शिडी नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. गेले तीन दिवस ते या कामात गुंतले होते. अडगळीत पडलेल्या शिडीचा त्यांनी केलेला वापर हे पाहून अनेकांनी त्यांची प्रशंसा केली आहे.