नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: शहरात वाहतूक कोंडी समस्या गंभीर बनली असून शहरात अवजड वाहनांसह अनेक वाहन वाहतूक नियमां कडे दुर्लक्ष करून रस्त्यावर धावत असल्याने शहरांतर्गत सर्वच रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना सर्वसामान्य जनतेसह वाहन चालकांना करावा लागत आहे. या समस्येवर उपाययोजनांसाठी भिवंडी पूर्वचे समाजवादीचे आमदार रईस शेख हे पुढे सरसावले असून त्यांनी मंगळवारी मुलायम सिंह युथ ब्रिगेडच्या वतीने भिवंडी वाहतूक पोलिसांना १०० प्लास्टिक बॅरिकेट्स भेट दिली.
ही भेट दिल्या नंतर रईस शेख व वाहतूक पोलिसांनी बेशिस्त मोटरसायकल चालवणाऱ्यांना गुलाबपुष्प देऊन वाहतुक नियमांचे पालन करण्याबाबत प्रबोधन करण्यात आले.तर भिवंडी वाहतूक शाखा वतीने जनतेला वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करून बेशिस्त वाहन चालकांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. याप्रसंगी वाहतूक विभाग भिवंडी शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष पाटील व शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महादेव कुंभार व समाजवादी पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.