सुरेश लोखंडे
ठाणे : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानास लागून असलेल्या येऊरच्या जंगलात तब्बल ११ हरणांसह ११ सांबर, सहा रानडुक्कर, २५ माकडांची नोंद झाली आहे. तर तुळशीविहार तलावाच्या परिसरात तब्बल तीन बिबट्यांची नोंद रात्रीच्या मचाणावरील वन्यप्राणी गणनेत घेण्यात आली आहे.ठाणे शहराला लागून असलेल्या संजय गांधी उद्यानाजवळ येऊर जंगल ठाणेकरांचे नैसर्गिक वैभव आहे. या जंगलात वास्तव्याला असलेल्या वन्यजीव प्राणी, पक्ष्यांची नोंदणी ५ मे रोजी रात्री करण्यात आली. या दिवशी पौर्णिमेच्या चांदण्यारात्री संजय गांधी उद्यानासह येऊर वनपरिक्षेत्र विभागाच्या वनाधिकाऱ्यांनी या वन्यजीव प्राण्याची गणना केली. यात मनसोक्त मुक्त संचार करणाऱ्या बिबट्यांसह, हरिण, सांबर, माकड, मोर, लांडोर, घुबड, घार, कोल्हे, काळवीट, रानडुक्कर आदी विविध पक्षी, प्राण्यांची गणना बुद्धपौर्णिमेच्या रात्री मचाणावर बसून तब्बल ३६ वन अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केली.
येऊरच्या जंगलास लागून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील तुळशी तलाव परिसरात तीन बिबट्यांची नोंद घेतली आहे. तहानेने व्याकूळ झालेले बिबटे रात्रीच्या अंधारात पाणी पिण्यासाठी बाहेर पडले असता त्यांची नोंद प्राणी गणनेत करण्यात आली आहे.
त्यांच्या या जागा हेरून येऊन वन अधिकाऱ्यांनी नदी, नाल्याच्या काठावरील पाणवठा म्हणजे येऊरमधील करंदीचे पाणी, चेणा नदी, वळकुंडीचे पाणी, टाकाचा नाला, आंब्याचे पाणी, चांभारखोंडा नाला, चिखलाचे पाणी, हुमायून बंधारा, माकडाचे पाणी, जांभळी, करवेल, तलवळी आणि कोरलाईच्या पाणवठ्यावर मचाण बांधल्या होत्या.
दिवसभर कडकडीत उन्हात दडून बसलेले व तहानेने व्याकूळ वन्य प्राणी, पक्षी रात्री पाणी पिण्यासाठी बाहेर पडतात. वैशाखाच्या या कडकडीत उन्हाळ्यात ते पाण्यावाचून जास्त काळ राहू शकत नाही. त्यामुळे ते ठरलेल्या पाणवठ्यावर रात्री पाणी पिण्यासाठी दररोज येतात.
येऊरच्या जंगलात
हरिण, सांबर, रानडुक्कर, लंगूर आणि माकडांची नोंद केली आहे. यासाठी जंगलातील पाणवठे, झरे, पाणथळ, पाण्याचे डोह, डबके, तलाव आदी ठिकाणी झाडझुडपात, झाडांवर मचाण बांधले होते. त्यावर रात्रभर बसून वनाधिकारी, कर्मचाऱ्यांनी या प्राण्यांची गणना केली आहे. पिण्यासाठी आलेल्या या प्राण्यांची, पक्ष्यांची नोंद अधिकाऱ्यांनी घेतली.