उल्हासनगर : कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या संभाजी चौकातील बहिणीकडे प्रसुतीसाठी आलेल्या महिलेला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उघड झाले. महापालिकेने महिलेच्या संपर्कात आलेल्या १० पेक्षा जास्त जणांना क्वारंटाईन केल्याची माहिती पालिका वैद्यकिय अधिकारी डॉ सुहास मलवलकर यांनी दिली.
उल्हासनगर कॅम्प नं-४ संभाजी चौक शिवसेना शाखे मागे राहणाऱ्या बहिणीकडे, मुंबई दहिसर येथे राहणारी महिला काही दिवसापूर्वी प्रसूतीसाठी आली होती. कल्याण येथील रुग्णालयात प्रसूती झाल्यानंतर कोरोना तपासणीत तीचा अहवाल कोरोना पोझिटीव्ह आला. याबाबतची माहिती महापालिकेला मिळाल्यानंतर महिलेच्या संपर्कात आलेल्या बहिणीसह नातेवाईकाना गुरवारी सकाळी महापालिका वैद्यकिय पथकाने क्वारंटाइन केले. अशी माहिती पालिका वैद्यकिय अधिकारी डॉ सुहास मलवलकर यांनी दिली.
गेल्या आठवड्यात संभाजी चौक जिजामाता कॉलनी येथे राहणाऱ्या व मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलिसांसह पत्नी, दोन मुली, एक मुलगा अश्या पाच जणांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्या पाठोपाठ चौक परिसरातील मेडिकल मध्ये काम करणारा मात्र कल्याण येथे राहणाऱ्या तरुणाला कोरोना झाल्याचे उघड झाल्यावर चौक परिसर पूर्णतः सील केला आहे.
शहरातील एकूण १७ कोरोना रुग्ना पैकी ११ रुग्ण कॅम्प नं-४ परिसरातील असून संभाजी चौक परिसरात ५ कोरोना रुग्ण आढळले आहे. तसेच संभाजी चौक परिसरातील मेडिकल मध्ये काम करणारा तरुण व बहिणीकडे प्रसूतीसाठी अालेली महिला कोरोना पोझिटीव्ह असल्याचे उघड झाले. एकूणच संभाजी चौक परिसर कोरोना रुग्णाचा हॉटस्पॉट झाला असून दररोज महापालिका जंतुनाशक फवारनी करीत आहे.