ठाणे : नववर्षाच्या पूर्वसंध्येला ठाण्याच्या ३५ वर्षीय समीर पाटीलने धरमतर ते गेटवे आॅफ इंडिया हे ३६ किलोमीटरचे अंतर ९ तास १ मिनिटांत पोहून पूर्ण करत सागरी जलतरण मोहीम फत्ते केली. अवघ्या दोन वर्षापूर्वी पोहायला शिकलेल्या समीरच्या या यशस्वी कामगिरीचे समस्त ठाणेकरांकडून कौतुक होत आहे. समीरने १२ अंश सेल्सियस तापमान असलेल्या पाण्यात पहाटे ३.२० वाजता अलिबाग जवळ असलेल्या धरमतरपासून पोहण्यास सुरु वात केली. दाट धुके आणि समुद्रातील पाण्याचा बदलता प्रवाह यावर मत करत त्याने दुपारी १२ वाजून १ मिनिट झाले असताना गेटवे आॅफ इंडियाच्या पाय-यांना हात लावला. लहानपणापासून त्याला पोहण्याची आवड होती. परंतू त्याने कोणतेही व्यावसायीक प्रशिक्षण घेतले नव्हते. ही आवड जपण्यासाठी त्याने दोन वर्षापूर्वी ठाणे हेल्थ क्लबमध्ये किरण पाठक आणि सुजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोहायला शिकण्यास सुरु वात केली. त्यानंतर साहसी सागरी जलतरण करण्याचा निर्णय पक्का करत समीरने पाठक - पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रोज किमान चार तास पोहण्याचा सराव केला.या मोहिमेच्याआधी समीरने एलिफंटा ते गेटवे आॅफ इंडिय , गोव्यात झालेली २५ किलोमीटर अंतराची स्विमथोन स्पर्धा, नौदाल्ची सागरी जलतरण स्पर्धेत आपला दम अजमावला होता. भविष्यात मोठी कामगिरी करण्याची इच्छा असल्याचे त्याने लोकमतशी बोलताना सांगितले.
समीरची सागर भरारी फत्ते!
By admin | Published: January 04, 2016 1:56 AM