कल्याण : आघाडीचा जाहीरनामा सर्वांगिण विकासाचा असल्याचे सांगत स्वच्छ-सुंदर- हरीत कल्याण डोंबिवली शहरासाठी आम्ही कटीबध्द असल्याचा दावा काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला आहे. माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा जाहीरनामा मंगळवारी प्रसिध्द करण्यात आला. पारदर्शी प्रशासन, उत्तम आरोग्य सुविधा, प्रदुषण मुक्त शहर, सुविधांयुक्त परिवहन सेवा, खड्डेमुक्त सुस्थितीतील रस्ते, चालण्यासाठी पदपथ, मुबलक व शुध्द पाणीपुरवठा, महिलांच्या कल्याणासाठी उपक्रम, सफाई ब्रिगेडची निर्मिती, उत्तम शैक्षणिक सुविधा, संपन्न सांस्कृतिक उपक्रम, युवकांचे कल्याण, ज्येष्ठ नागरीकांना आधार यासाठी आम्ही कटीबध्द असल्याचे आश्वासन आघाडीच्या जाहीरनाम्यात दिले आहे.मुलभूत सोयी सुविधांबरोबरच वाढत्या लोकसंख्येसाठी मेट्रो रेल्वे, वाहतुक कोंडी दुर करण्यासाठी बायपास मार्ग, उड्डाणपुल उभारणे, सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करणे यावर भर दिला जाणार आहे. कल्याण डोंबिवलीकरांना माफक व वक्तशीर परिवहन सेवा, नवीन बसमार्ग, ठाणे, भिवंडीसाठी वातानुकूलीत बससेवा याकडे विशेष प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले. आपले शहर स्वच्छ व सुंदर राखण्यासाठी सफाई ब्रिगेड ही नवी संकल्पना राबविण्याचे अभिवचन देण्यात आले आहे. याअंतर्गत कचरा उचलण्यासाठी टोल फ्री नंबर देण्यात येणार आहे. या क्रमांकावर संपर्क साधताच सोसायटीचा परिसर व सार्वजनिक परिसरातील कचरा तात्काळ उचलण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सांडपाणी व पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी सक्षम यंत्रणा तसेच सांडपाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा उभारणे ही या जाहीरनाम्याची वैशिष्टये ठरली आहेत. याचबरोबर महिला सबलीकरण, दलित वस्ती सुधारणा, झोपडपट्टी सुधारणा, जुन्या चाळी व इमारती व भाडेकरूंचा पुर्नविकास, उद्याने व खेळाची मैदाने, सुस्सज अग्नीशामक केंद्र यावर भर देण्यात आला आहे.
स्वच्छ-सुंदर-हरित शहरांसाठी कटिबद्ध
By admin | Published: October 28, 2015 11:16 PM