ठाणे - जिल्ह्यात वारंवार लॉकडाऊन करण्यात येत असल्याने हातावर पोट असणार्यांची आता उपासमार होऊ लागली आहे. चप्पल आणि छत्री दुरुस्ती करुन पोट भरणार्या गटई स्टॉल धारकांचे कामे दोन तासांसाठी सुरु करण्याची मागणी करुनही प्रतिसाद मिळत नसल्याने या कामगारांमध्ये संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या या कामगारांकडून गटई चर्मकार समाज कामगार संघटनेचे अध्यक्ष तथा वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हा समन्वयक राजाभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी ‘धूर आंदोलन’ छेडण्याचा इशारा जिल्हा प्रशासनासह महापालिकेला देण्यात आला आहे.
या आंदोलनाच्या दृष्टीने ठाणे जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. या लॉकडाऊनच्या काळात ठाणे शहरात हातावर पोट असणार्यां गटई कामगारांचे हाल होत आहेत. रिकाम्या पोटी व अर्धपोटी राहू लागली आहेत. गटई स्टॉलद्वारे चप्पल, छत्री दुरुस्ती करुन कुटुंबियांचा चरितार्थ या लाँक डाऊनमुळे करणे शक्य होत नाही. एकीकडे ठाणे शहरात मद्यविक्री सुरु करण्यात आलेली आहे. अनेक लॉज सुरु करण्यात आलेले आहेत. अशा स्थितीमध्ये केवळ गरीबांच्या पोटावरच पाय देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप या गटई कामगारांकडून केला जात आहे.
या गटई कामगारांच्या स्टॉलवर कधीच गर्दी होत नाही. त्यामुळे फिजीकल डिस्टन्सींगचेही पालन योग्य रितीने होऊ शकते. तरीदेखील गटई स्टॉल उघडण्यास मनाई करण्यात येत असल्याने या वर्गाची उपासमार होत आहे. त्यातच या स्टॉलचा कर, वीजबिल भरण्याची सक्ती करण्यात येत आहे. ही सक्ती रद्द करुन वीजबिल आणि मालमत्ता कर माफ करावा, अशी मागणी लावून धरण्यात आली आहे. त्यावर निर्णय न घेतल्यास 20 जुलै रोजी सकाळी 11 वाजता शेकडो चर्मकार बांधव भिक मागून आणलेला शिधा ठामपा मुख्यालयासमोर चूल पेटवून शिजवतील तसेच याच ठिकाणी ठाण मांडून बसतील, असा चव्हाण यांनी दिला आहे.