सदानंद नाईक -
उल्हासनगर - लोकमतच्या कुपोषित बालकाच्या बातमीची दखल संच्युरी रेयॉन कंपनीने घेऊन, ४४ कुपोषित बालकाचे तात्पुरते पालकत्व (जबाबदारी) स्वीकारले आहे. कंपनीच्या सभागृहात बुधवारी कुपोषित बालकांच्या आरोग्याची तपासणी करून तंज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना पोषक आहार देण्यात आला, अशी माहिती बालविकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी सुवर्णा जाधव यांनी दिली.
उल्हासनगर सारख्या औद्योगिक शहरात बालविकास विभागाअंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी सेविकांच्या सर्वेक्षणात तब्बल ९२ मुले कुपोषित असल्याची बातमी लोकमतने गेल्या आठवड्यात प्रसिद्ध केली होती. लोकमतच्या बातमीची दखल संच्युरी रेयॉन कंपनीच्या व्यवस्थापनाने घेऊन, ४४ कुपोषित बालकांचे तात्पुरते पालकत्व (जबाबदारी) स्वीकारले. कंपनी कुपोषित मुलांना सलग ९० दिवस वैद्यकीय मार्गदर्शनाखाली पोषक आहार देणार आहे. पहिल्या ३० दिवसाचा पोषक आहार बुधवारी मुलांच्या पालकांकडे देवून ३० दिवसांनंतर मुलांची वैद्यकीय आरोग्य तपासणी करून पोषक आहार दिला जाणार आहे. या कार्यक्रमाला कंपनीचे वरिष्ठ अधिकारी, जनसंपर्क अधिकारी मेहुल लालका, बालविकास प्रकल्प अधिकारी सुवर्णा जाधव आदी उपस्थित होते.
संच्युरी रेयॉन कंपनी कुपोषित मुलांसाठी पायलट प्रोजेक्ट राबवित असून त्यांच्या आहारात रोज दोन वेळा १०० ग्रॅम दूध, एक राजगिरा लाडू, एक नाचणी लाडू व शेंगदाण्याची १०० ग्राम चिक्की पॉकेट देण्यात आले. मुलांना पोषक आहारा बरोबर दिला जातो की नाही. याचे निरीक्षण स्थानिक अंगणवाडी सेविका करणार आहे. तसेच त्यांची नियमित वजन, उंची यांची तपासणी डॉक्टरांच्या हस्ते होणार आहे. ९० दिवसांनंतर बालकांच्या सुपोषणाचे उद्दीष्ट साध्य होत आहे. हे दिसून आल्यानंतर या उपक्रमाचे क्षेत्र व स्वरुप वाढवण्याचे संकेत कंपनीचे वरिष्ठ अधिकारी व जनसंपर्क अधिकारी मेहुल लालका यांनी दिले.
बालविकास प्रकल्प अधिकारी सुवर्णा जाधव यांचे श्रेय अंगणवाडी शिक्षिका व सेविकांना दिले. तसेच सामान्य मुलांपेक्षा कुपोषित मुलांना दुप्पट आहार अंगणवाडी मार्फत दिला जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.