ठाणे : घोडबंदर भागातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहातील मिनी थिएटर दुरूस्तीही न करता अघोषित बंद ठेवल्याने तेथील स्पर्धा, विविध कार्यक्रम, प्रयोगांना फटका बसून नाट्य चळवळीलाच नख लागले आहे. दुरुस्तीच्या नावासाठी बंद झालेल्या या मिनी थिएटरबाबत ठाण्यातील कलाकारांनी नाराजी व्यक्त केली असून प्रशासनाच्या गलथान कारभारावर ताशेरे ओढले आहे. योग्य वेळेत आणि चांगल्या अवस्थेत हे मिनी थिएटर सुरू व्हावे, अशी अपेक्षा हे रंगकर्मी व्यक्त करीत आहेत. तसे न झाल्यास ठाण्यातील सर्व रंगकर्मी आंदोलन करतील, असा कडक इशाराही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला.प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर डॉ. घाणेकर नाट्यगृहातील मुख्य थिएटर आॅगस्ट महिन्यात सुरु झाले. पण मिनी थिएटर मात्र १ आॅक्टोबरपासून अघोषित बंद ठेवण्यात आले. दुरूस्तीसाठी ते बंद ठेवण्यात आले असले तरी त्याचे काम अद्यापही सुरु च झाले नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यासाठी अजून खर्चही मंजूर झालेला नाही, तरीही ते बंद ठेवण्यात आले आहे. याबाबत ठाण्यातील कलाकारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.विश्वासात तरी घ्यापालिकेतील सांस्कृतिक विभाग हा सगळ््यात कमी लक्ष दिला जाणारा विभाग आहे, असे वाटू लागले आहे. प्रत्येक प्रभागात नको असलेल्या अॅम्फी थिएटरसाठी प्रस्ताव येतात. त्यांचा मात्र फारसा वापर होताना दिसत नाही. घाणेकर नाट्यगृहातही अॅम्फी थिएटर आहे हे अनेकांना माहितही नाही. नुकतीच संबंधित अधिकाºयांची भेट घेऊन मिनी थिएटरकडे प्राधान्याने लक्ष द्या, असे आम्ही सांगितले. उपवन तलावाजवळ अॅम्फी थिएटर उभारले; पण उपवन फेस्टिव्हल सोडून त्याचा किती उपयोग होतो? जे अॅम्फी थिएटर आधीपासून आहे त्याच्या दुरुस्तीकडे प्राधान्याने लक्ष द्यायला हवे. मिनी थिएटरमध्ये समस्या खूप आहेत. परंतु कलाकारांना विचारात न घेता पालिकेने दुरुस्तीचा निर्णय घेतला. काय समस्या आहेत, हे आम्हाला विचारले असते तर आम्ही ही सांगू शकलो असतो. - विजू मानेपालकमंत्र्यांना भेटणारआम्ही सर्व कलाकार पालकमंत्र्यांची भेट घेणार आहोत. मिनी थिएटरची नेमकी काय परिस्थिती आहे? काम सुरू झाले नाही? त्याची कारणे काय आहेत? डिसेंबर महिन्यात काम पूर्ण होईल, या दिलेल्या आश्वासनानुसार मिनी थिएटर पूर्ण दुरुस्त होईल का? दुरुस्तीमध्ये मिनी थिएटरच्या सर्वच समस्या सोडविणार का? सर्व्हे केला असेल तर नेमका काय सर्व्हे केला? अशा अनेक प्रश्नांसंदर्भात त्यांच्याशी बोलणार आहोत. रसिक प्रेक्षक, टॅगचे सदस्य आणि कलाकार म्हणून हे मिनी थिएटर चांगल्या अवस्थेत सुरू व्हावे, असेच वाटते. या थिएटरमध्ये टॅगचे कार्यक्रम, बालनाट्य, हौशी संस्थांचे प्रयोग होत असतात. पण जर हे थिएटरच दोन-तीन महिने बंद राहणार असेल, तर त्याला काही अर्थ नाही. चांगल्या अवस्थेत आणि योग्य वेळेत मिनी थिएटर पूर्ण झाले नाही तर ठाण्यातील रंगकर्मी आंदोलन उभारतील. - उदय सबनीस
मिनी थिएटरसाठी रंगकर्मी आंदोलनाच्या पवित्र्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 12:33 AM