सुरेश लोखंडे ठाणे : पर्यावरण संतुलन राखण्यासाठी नदी व खाडीतील वाळूउपसा करण्यासाठी न्यायालयाने बंदी घातली आहे. पण, मुंब्रा खाडीत वाळूउपसा राजरोसपणे सुरू आहे. कांदळवने नष्ट करून रेतीमाफियांकडून वाळूचे उत्खनन केले जात आहे. यामुळे खाडीचे पाणी येथील रेल्वेरुळांना कवेत घेण्याची भीती आहे.
उल्हास नदी, भातसा, गांधारी या नद्यांचा कल्याणजवळ संगम होऊन या नद्यांचे पाणी पुढे दुर्गाडी किल्ल्यामागून वाहत जाते. दिवा, मुंब्रा व कळवा खाडीत रेतीमाफियांकडून वाळूउपसा सुरू आहे. खाडीकिनाऱ्याचे कांदळवन नष्ट करून त्यातील वाळूचा सक्शन पंपाद्वारे उपसा केला जात आहे. त्यामुळे त्सुनामीपासून बचाव करणारे कांदळवन नष्ट होत आहे. कांदळवनाच्या सुरक्षेचे न्यायालयीन आदेश विचारात घेऊन वाळूउपसा थांबवणे व कांदळवनाचे संरक्षण करण्याची गरज आहे. पण त्याकडे अजूनही गांभीर्याने पाहिले जात नाही.
रेल्वेरुळांना फटकाजलद रेल्वेमार्गावरील रेल्वेपुलाजवळ किनाऱ्यावरील कांदळवन नष्ट करून जेसीबीद्वारे मोठा खड्डाही केला आहे. त्यामुळेही खाडीपात्राची रुंदी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अतिवृष्टीमुळे या खाडीचे पाणी या रेल्वेरुळांना लागण्याची भीती निर्माण झाली आहे. तर, पात्र खोल झाल्यामुळे या खाडीतील दोन्ही जुन्या पुलासही धोका संभवण्याची शक्यता आहे.
दररोज होणारा वाळूउपसामुंब्रा-दिवा खाडीतील रेतीमाफियांच्या मनमानीला आळा घालण्यासाठी काही महिन्यांपूर्वी प्रशासनाने या खाडीत कारवाई करून दोन कोटींच्या आठ बार्ज व ६४ लाखांचे आठ सक्शन पंप जेसीबीद्वारे तोडले होते. या खाडीकिनारी रेती साठवण्याचे १५ कुंडही तोडले आहेत. पण, याही कारवाईत गुन्हेगार हाती न लागता पळून गेले. दरम्यान, दररोज ६० ते ७० ब्रास वाळूउपसा मुंब्रा खाडीत होतो.
वाळूउपशामुळे मुंब्रा, दिवा खाडीची खोली वाढत आहे. त्याचा परिणाम याच खाडी किनाऱ्यावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांवर होऊ शकतो. तर, कांदळवन तोडल्याने खाडीचे पाणी पावसाळ्यात रुळांना लागले होते. पण, वाहतूककोंडी टाळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या समांतर रस्त्यासाठी कांदळवन तोडावे लागणारच.- हेमंत कारखानीस, पर्यावरणतज्ज्ञ