- सुरेश लोखंडेलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : राज्य शासनाने जिल्ह्यात ६०० रुपये ब्रासने रेती वितरण करण्याचे धोरण अवलंबिले आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासनाने तब्बल दोन लाख ४८ हजार ५३३ ब्रास रेती वाटप करण्याचा निर्णय घेऊन ई-निविदेद्वारे ही प्रक्रिया राबविण्याकरिता यंत्रणा सज्ज केली आहे. यासाठी खाडी व नदीचे सात लाख तीन हजार ३४० घनमीटर क्षेत्र पोखरण्यात येणार आहे. या रेती वाटपात सुसूत्रता आणण्यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडणार आहे.
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील विविध प्रकारच्या बांधकामांसाठी व मागेल त्यास स्वस्तात म्हणजे ६०० रुपये ब्रासने रेती वितरण करण्याचा निर्णय जाहीर झाला. त्यासाठी प्रारंभीच तब्बल दोन लाख ४८ हजार ५३३ ब्रास रेतीचे उत्खनन हाती घेण्यात आले आहे. गुरुवारी अधिकृत एजन्सीची निवडही करण्यात आली.
सोमवारी बैठक घेऊन या रेती उत्खननासह डेपोपर्यंत होणारा पुरवठा व तेथून होणारे वितरण आदींविषयी खास आराखडा तयार करून त्यानुसार अंमलबजावणी करण्यासाठी चर्चा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे स्वस्तात रेती उपलब्ध होणार असल्यामुळे रेती माफियांचे धाबे दणाणले आहेत.
जिल्ह्यातील बांधकामांसाठी ही रेती उपलब्ध करून देण्याचे धोरण अवलंबिले आहे. रेतीचे उत्खनन, साठवण व ऑनलाइन वितरण करणारे डेपो सज्ज करण्यात आले आहेत. कल्याण आणि मोटागाव या दोन डेपोंवर दोन लाख ४८ हजार ५३३ ब्रास रेतीची साठवण होऊन ऑनलाइन वितरण करण्याचे निश्चित केले आहे.
रेतीचे उत्खनन उल्हास नदी पात्र व कल्याण, मोटागाव खाडीतून करण्यासाठी मेरीटाइम बोर्डाने परवानगी दिली आहे. दोन डेपोंसाठी लागणारी रेती उल्हास नदी व खाडीपात्रातील सात लाख तीन हजार ३४० घनमीटर क्षेत्रातून उत्खनन केले जाणार आहे. या नदीपात्रातील आठ ठिकाणी या रेतीच्या उत्खननाच्या जागा निश्चित करण्यात आलेल्या आहेत. उल्हास नदी पात्र ते कल्याण आणि डोंबिवली ते कल्याण या दोन घाटांतून या रेतीचे उत्खनन करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
मोठागांव डेपोसाठी ७४ हजार ३९४ ब्रास रेतीया डेपोसाठी उल्हास नदी पात्र व खाडीच्या दोन लाख दहा हजार ५३० घनमीटर परिसरातून रेतीचे उत्खनन होईल. आठ ठिकाणी होणाऱ्या या उत्खननातून ७४ हजार ३९४ ब्रास रेती काढण्यात येणार आहे.
कल्याण डेपोसाठी एक लाख ७४ हजार १३९ ब्रास रेतीडोंबिवली ते कल्याण या खाडी पात्रातील रेती घाटातून एक लाख ७४ हजार १३९ ब्रास रेती काढण्याचे निश्चित झाले आहे. आठ ठिकाणांच्या तब्बल चार लाख ९२ हजार ८१० घनमीटर क्षेत्रातून रेतीचे उत्खनन होऊन या डेपोपर्यंत वाहतूक करण्यात येणार आहे.