भिवंडी : शहरातील महेश्वरी महिला समितीच्यावतीने नागाव येथील आशीर्वाद हिंदी हायस्कूलच्या विद्यार्थिंनीसाठी त्याच विद्यालयात सॅनेटरी नॅपकिन व्हेण्डींग मशीन दिले आहे. मात्र या मशीनमध्ये पाच रूपये टाकल्यानंतर मुलींना एक सॅनेटरी नॅपकिन मिळणार आहे,अशी माहिती समितीच्या अध्यक्षा सीमा डागा यांनी दिली.
गोरगरिब परिवारातील मुलींमध्ये जागरूकता आणण्यासाठी ही मशीन लावली असून त्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी याची मदत होणार आहे. त्याच प्रमाणे गरीब मुलींच्या सोयीसाठी शहरातील गरीब वस्तीतील दोन शाळांमध्ये अशा प्रकारचे मशीन लावण्यात येणार असल्याची माहिती महेश्वरी महिला समितीच्या भवरीदेवी मुंदडा यांनी दिली. या प्रसंगी डागा यांनी दिले की, मागील तीन वर्षात महिला समितीच्या वतीने ८० आदिवासी परिवारास एक महिन्याचे रेशन,३०० नागरिकांना घोंगडी, मुलींसाठी भोजन व कपडे तसेच विद्यार्थ्यांसाठी शिक्षणसामग्री दिली. या कार्यक्रमासाठी सरिता बागडी, संगीता लोहिया, सरिता मुंदडा, शांती मुंदडा, सोनू दुजारी, प्रेमलता लोहिया व शर्मिला मालपानी आदी उपस्थित होते. तर आशीर्वाद हिंदी हायस्कूलच्यावतीने दीपक सिंह, लालाबिहारी विश्वकर्मा, साबीर अली शेख व आय्याज शेख आदी उपस्थित होते. रविवारी ६१ व्या वार्धपनदिनानिमित्ताने शहरातील महेश्वरी मंडळाने ब्राह्मण आळीतील श्री गोपाळकृष्ण मंदिराच्या हॉलमध्ये रक्तदान शिबिर झाले. या शिबिरात १७० बाटल्या संकलित झाल्या, असे सांगण्यात आले.