सदानंद नाईक उल्हासनगर : महापालिका अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी सोमवारी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसह स्वच्छतेचा आढावा घेतला. यावेळी प्रभाग क्रं-१९ मधील ४ कर्मचारी गैरहजर आढळल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस देऊन खुलासा मागितला आहे. लेंगरेकर यांच्या आढाव्याने सफाई कामगारांसह विभागाच्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
उल्हासनगर महापालिका आरोग्य विभागातील स्वच्छता कामगार कामाच्या ठिकाणी गैरहजर तर काही सफाई कर्मचाऱ्यांच्या बदल्यात खाजगी बदली माणसे काम करीत असल्याच्या तक्रारी या अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्याकडे आल्या होत्या. तक्रारींचे निवारण करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसह सोमवारी काही प्रभागात स्वच्छता आढावा घेतला. यावेळी प्रभाग क्रं-१९ (ब) मध्ये काम करणारे तब्बल ४ सफाई कामगार गैरहजर होते. याबाबत आरोग्य विभागाचे उपायुक्त सुभाष जाधव व अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी स्वच्छता निरीक्षक व मुकादम तसेच संबधित कर्मचाऱ्यास नोटीसा देऊन खुलासा मागितला. अतिरिक्त आयुक्त लेंगरेकर यांच्या स्वच्छता आढाव्याने सफाई कामगार व आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
महापालिका सफाई कामगार हे मुकादम, स्वच्छता निरीक्षक आदी अधिकाऱ्यांना हाताशी धरून, त्याच्या बदल्यात खाजगी कामगार बदली देत असल्याच्या तक्रारीत वाढ झाली होती. यापूर्वी बदली कामगार ठेवण्याचा भांडाफोड होऊन, काही कामगारांना महापालिकेने बडतर्फ केले. बदली कामगार ठेवून वर्षानुवर्षे गैरहजर राहणाऱ्या सफाई कामगारांसह संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी सर्वस्तरातून होत आहे. लेंगरेकर यांच्या स्वच्छता आढाव्याने बदली कामगारांचे भिंग फुटण्याची शक्यता व्यक्त होत आहे.